मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारातून बॅग नेण्यास मनाई; सुरक्षा आणखी कडक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 10:45 AM2021-09-07T10:45:10+5:302021-09-07T10:45:41+5:30
मंत्रालयीन कर्मचाऱ्यांच्याही बॅग केल्या स्कॅन
गणेश देशमुख
मुंबई : मंत्रालयात जाताना केली जाणारी तपासणी सोमवारपासून आणखी कडक करण्यात आली आहे. बॅग सोबत असणाऱ्या मंत्रालयातील कर्मचाऱ्यांनाही मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश नाकारला जात आहे. सुरक्षेत अचानक आलेला हा कडकपणा लक्षवेधी ठरला.
मुख्य प्रवेशद्वारावर मेटल डिटेक्टर आहे, स्कॅनर नाही. वरिष्ठ आणि अनुभवी अधिकारी तेथे तैनात असतात. मंत्रालयातील दैनंदिन परिचित कर्मचाऱ्यांना यापूर्वी बरेचदा बॅग वा कार्यालयीन साहित्याच्या वजनी खोक्यांसह सोडले जायचे. सोमवारी मात्र हा प्रकार बंद करण्यात आला. सवयीप्रमाणे अनेक जण साहित्यासह मुख्य प्रवेशद्वारांतून जाण्यास आग्रह धरून बसले; परंतु बॅग, साहित्य असेल तर स्कॅन केल्यानंतरच ते मंत्रालयाच्या आवारात सोडले जाईल, अशी स्पष्ट भूमिका अधिकाऱ्यांनी घेतली. त्यामुळे संबंधितांना मागच्या प्रवेशद्वारातून पाठविले गेले. अभ्यागतांची वाढलेली संख्या, सणावारांचे दिवस आणि काही वेगळे घडले की पोलिसांकडे दाखविले जाणारे बोट, या बाबींचीही पार्श्वभूमी या सुरक्षेतील चोखपणाला आहे.
येणाऱ्या प्रत्येकाची नियमानुसार कडक तपासणी झालीच पाहिजे, असे आदेश नेहमीसाठीचेच आहेत. ‘तोंड बंद ठेवा; पण तपासणी चोख करा’, असे माझे नेहमीच सांगणे असते.
- दीपक साकोरे, उपायुक्त तथा मंत्रालय सुरक्षा प्रमुख