मिठी नदीची वहन क्षमता तिप्पटीने वाढली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2020 03:30 PM2020-09-04T15:30:18+5:302020-09-04T15:30:49+5:30
मिठी नदी अधिकाधिक स्वच्छ करण्यावर भर दिला जात आहे.
मुंबई : मिठी नदीचे खोलीकरण, रुंदीकरण, खडक खोदाई, संरक्षक भिंत, सर्व्हीस रोड, सुशोभिकरणाची कामे या कामांपैकी बहुतांशी कामे पुर्ण झाली असून, त्यामुळे नदीच्या वहन क्षमतेत तिप्पटीने वाढ झाल्याचा दावा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने केला आहे. दरम्यान, आता मिठी नदी अधिकाधिक स्वच्छ करण्यावर भर दिला जात आहे.
मिठी नदीचा उगम विहार व पवई जलाशयाच्या प्रवाहातून होत असून मिठी नदीची लांबी १७.८४ किमी आहे. मिठी नदी सीप्झ, मरोळ, अंधेरी, आंतरराष्ट्रीय विमानतळाची धावपट्टी खालून वाहते. त्यानंतर बैलबाजार, कुर्ला, वांद्रे-कुर्ला संकुलातून माहीम खाडीद्वारे १५ पुलांच्या खालून वाहत अरबी समुद्राला मिळते. मिठी नदीचे पाणलोट क्षेत्र ७ हजार २९५ हेक्टर आहे. उगम स्थानी ती समुद्र सपाटीपासून २४६ मीटर उंच आहे. मिठी एकूण १७.८४ किमी लांब असून, यापैकी ११.८४ किमी लांबीचा भाग हा मुंबई महापालिकेच्या अधिपत्याखाली तर ६ किलोमीटर लांबीचा भाग हा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अखत्यारित आहे. हा ६ किमी भाग भरतीच्या प्रवाहा अंतर्गत येतो.
१ ऑगस्ट २००० रोजी मिठी नदी विकास व संरक्षण प्राधिकरण स्थापन करण्यात आले. मात्र अद्याप समाधानकारक कामे झाले नाही. मिठी नदीच्या प्रकल्पावर आतापर्यंत १ हजार ४०० कोटी रुपये खर्च झाले आहेत. कंत्राटी कालावधीदरम्यान मिठी नदीतून सुमारे १ लाख ३८ हजार ८३० मेट्रीक टन एवढा गाळ उपसण्याचे लक्ष्य असते. यापैकी बहुतांशी गाळ हा पावसाळ्यापूर्वी काढला जातो, असा दावा महापालिकेचा आहे. आणि दुसरीकडे २६ जुलैच्या पुराला १५ वर्षे पुर्ण झाली असतानाच आजही मिठी नदीच्या साफ सफाईवर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे. विशेषतः याकामी मिळालेला निधी मिठी नदीच्या गाळातच रुतल्याचे चित्र असून, २०१० मध्येच हा प्रकल्प पाच वर्षांत पूर्ण होणार होता. मात्र निम्मे काम देखील झालेले नाही.