लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : प्रेयसीच्या चारित्र्याचा संशय आला आणि त्याने तिची हत्या करत तिचा मृतदेह सुटकेसमध्ये भरला. ती सुटकेस घेवून ताे मुंबईत फिरत राहिला. या घटनेचा छडा लावण्यात वडाळा पोलिसांना यश आले. प्रियकर अस्कर मनोज बरला (२२) याला गुन्हे शाखेने अटक केली आहे.
कुर्ला येथे मेट्रो रेल्वेच्या बांधकामाजवळ रविवारी एका महिलेचा मृतदेह सुटकेसमध्ये सापडल्याने खळबळ उडाली. कुर्ला पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनीही समांतर तपास सुरु केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखेच्या कक्ष ५ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक घनश्याम नायर व कक्ष ११ वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आठ तपास पथके तयार केली. तरुणीची ओळख पटविण्यात यश आले. तरुणीचा प्रियकर गावी ओडिशाला पळून जाण्याच्या तयारीत असताना माहिती मिळताच पथकाने ठाणे रेल्वे स्थानकातून त्याला अटक केली.
प्रतिमा पवल किसपट्टा (२५) असे मृत मुलीचे नाव असून ती मूळची ओडिसा येथील रहिवासी असून धारावीत रहायची. ती आरोपी बरला सोबत २०२१ पासून लिव्ह इन रिलेशनमध्ये होती. चारित्र्याच्या संशयातून दोघांमध्ये खटके उडायचे. शनिवारी रात्री साडेआठ ते नऊच्या सुमारास दोघांमधील वाद टोकाला पोहचला आणि बरलाने तिची गळा दाबून हत्या केली.
लॉकडाऊनदरम्यान ओळख अन् प्रेमnलॉकडाऊन दरम्यान कामगारांनी गावाची वाट धरताच परतीच्या रेल्वे प्रवासादरम्यान २०२० मध्ये प्रतिमाची अस्करसोबत ओळख झाली होती. दोघे एकाच गावातील निघाल्याने त्यांच्यात संवाद वाढला. nलॉकडाऊननंतर पुन्हा मुंबईत येताना दोघांची भेट झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. प्रतिमा पवल किसपट्टा (२५) ही मुंबईत मोलकरणीचे काम करत होती, तर अस्कर हा सुरूवातीला बेंगळूरमध्ये नोकरीला होता.
अशी पटली ओळखतरुणीच्या गळ्यातील क्रॉस आणि अंगावरील कपड्यांवरून ती ख्रिश्चन तसेच मध्यम वर्गीय कुटुंबातील असल्याचा अंदाज पथकाने बांधला. हत्येच्या चार ते पाच तासातच मृतदेह फेकल्याचे समजल्याने जवळपासच गुन्हे शाखेने तपास सुरु केला. ती धारावीत राहत असल्याचे समोर आले.
पुरावा नष्ट करण्यासाठी शोधाशोध सुरु असताना सुटकेस त्याच्या नजरेस पडली. अखेर, सुटकेसमध्ये मृतदेह टाकून निर्जनस्थळी फेकून देण्याचे त्याने ठरवले हाेते.
सततच्या चॅटिंगमुळे चिडचिडnप्रतिमा धारावीत भाड्याने राहण्यास होती. महिनाभरापूर्वीच तिने अस्कर याला बेंगळूरवरून मुंबईत बोलावले. १५ दिवसांपूर्वी तो मिठाईच्या दुकानात नोकरीला लागला.nप्रतिमा ऐकत नाही. ती मित्रांसोबत चॅटिंग करत असल्याने त्याने तिच्यावर संशय घेत हत्या केल्याची माहिती समोर आली.
मृतदेह भरलेली सुटकेस घेऊन तो पायी सायन सर्कल येथे आला. तेथून सव्वा बाराच्या सुमारास रिक्षा पकडली. रिक्षाने लोकमान्य टिळक टर्मिनस गाठले. मात्र तेथे गर्दी बघून भीती वाटल्याने त्याने दुसरी रिक्षा पकडली. मात्र ती सायनच्या दिशेने निघाली. रिक्षा दुसऱ्या दिशेने जात असल्याने त्याने रिक्षा मध्येच थांबवली. दीड तासांच्या प्रवासानंतर तो कुर्ला येथील मेट्रो रेल्वेच्या बांधकामाच्या ठिकाणी आला. तेथे अंधार असल्याचे पाहून तिथेच सुटकेस फेकून रिक्षाने घरी परतला.