Join us

कारशेड अधांतरी! तरीही मेट्रो-3चे पाच कोच तयार; आंध्र प्रदेशमधील कंपनीकडे काम

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2020 3:08 AM

Metro 3 Coaches: कुलाबा ते सीप्झ या मेट्रो मार्गावर ८ डब्यांचा ३१ ट्रेन धावणार आहेत. प्रत्येक ट्रेनमध्ये एका वेळेला किमान तीन हजार प्रवाशांची ने-आण करणे शक्य होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कुलाबा - सीप्झ मार्गावरील मेट्रो तीनचे कारशेड सरकारने आरे कॉलनीतून हद्दपार केले असले तरी ते कांजूरमार्ग येथील पर्यायी जागेत उभारणीच्या प्रयत्नांतील विघ्न कायम आहे. कारशेडचा हा तिढा सुटत नसला तरी या मेट्रो मार्गावर धावणाऱ्या २४८ कोचपैकी पहिले पाच कोच मात्र तयार झाल्याची माहिती हाती आली आहे. आंध्र प्रदेश येथील एलस्टॉम कंपनीला मेट्रो ट्रेनच्या बांधणीचे काम देण्यात आलेले आहे.

कुलाबा ते सीप्झ या मेट्रो मार्गावर ८ डब्यांचा ३१ ट्रेन धावणार आहेत. प्रत्येक ट्रेनमध्ये एका वेळेला किमान तीन हजार प्रवाशांची ने-आण करणे शक्य होणार आहे. मेट्रो रेल कॉर्पोरेशनने या ट्रेन तयार करण्याचे काम एलस्टॉम या भारतीय कंपनीला दिले आहे. त्यासाठी २४०० कोटी रुपयांचा करार गेल्या वर्षी या कंपनीसोबत करण्यात आला होता. या मार्गिकेवरील पहिला टप्पा डिसेंबर, २०२१ रोजी सुरू करण्याचे नियोजन होते. त्यानुसार नोव्हेंबर, २०२० पर्यंत काही कोच चाचणीसाठी दिले जाणार होते.मात्र, या मार्गिकेसाठी आवश्यक असलेल्या कारशेडचे कामच अद्याप सुरू झालेले नाही. जागा निश्चितीबाबतही केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात वाद निर्माण झालेले आहेत. त्यामुळे या मेट्रोची धाव नियोजित कालावधीपेक्षा किमान दोन वर्षे लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे मेट्रोचे कोच तयार झाले तरी ते एलस्टॉम कंपनीतून बाहेर पडणार नाहीत.

एलस्टॉम कंपनीने मुंबई, दिल्ली, चेन्नई येथील मेट्रो प्रकल्पांसाठी ५०० रेक तयार करण्याचे करार केले आहेत. सुमारे तीन वर्षांनंतर दाखल होणाऱ्या मेट्रो ट्रेन अनअटेंडेड ट्रेन ऑपरेशन (यूटीए) अर्थात मोटरमनशिवाय धावणार आहेत. त्यात सीसीटीव्ही, प्रवाशांसाठी उद्घोषणा, मार्गिकांची आणि स्टेशनची माहिती, जीगाबाईट नेटवर्क यांसारखी अनेक फिचर्स असतील. या ट्रेन अत्याधुनिक आणि लाईटवेट श्रेणीतल्या असतील.५०० रेक तयार करण्याचे करारएलस्टॉम कंपनीने मुंबई, दिल्ली, चेन्नई येथील मेट्रो प्रकल्पांसाठी ५०० रेक तयार करण्याचे करार केले आहेत. मुंबईकरांच्या सेवेत सुमारे तीन वर्षांनंतर दाखल होणाऱ्या मेट्रो ट्रेन अनअटेंडेड ट्रेन ऑपरेशन (यूटीए) अर्थात मोटरमनशिवाय धावणार आहेत. त्यात सीसीटीव्ही, प्रवाशांसाठी उद्घोषणा, मार्गिकांची आणि स्टेशनची माहिती, जीगाबाईट नेटवर्क यांसारखी अनेक फिचर्स असतील. 

टॅग्स :मेट्रो