व्यंगचित्राने कोणालाही दुखावू नये
By Admin | Published: May 26, 2015 12:49 AM2015-05-26T00:49:39+5:302015-05-26T00:49:39+5:30
व्यंगचित्र किंवा अग्रलेख हे अभिव्यक्तीचे माध्यम असले, तरी त्यामुळे कुणी दुखावले जाणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. जर दुखावले गेलेच तर त्यांनी आपल्या पद्धतीने भावना व्यक्त केल्या
मुंबई : व्यंगचित्र किंवा अग्रलेख हे अभिव्यक्तीचे माध्यम असले, तरी त्यामुळे कुणी दुखावले जाणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. जर दुखावले गेलेच तर त्यांनी आपल्या पद्धतीने भावना व्यक्त केल्या तर दोष देऊ नये. म्हणूनच व्यंगचित्र काढताना ते टोकाचे काढू नये, असा सल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आणि व्यंगचित्रकार राज ठाकरे यांनी दिला. निमित्त होते स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या व्यंगचित्रकला वर्गाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे.
राज ठाकरे म्हणाले, व्यंगचित्रकला हा चित्रकलेतील शेवटचा टप्पा आहे. तो अधिक गांभीर्याने घेण्याची गरज आहे. वस्तुनिष्ठ चित्रे, शरीरशास्त्र, रेखाचित्र आदी प्रकारांमध्ये कौशल्य प्राप्त करून घेतल्यानंतरच या विषयाकडे वळता येईल. त्यासाठी आपल्याकडे प्रचंड निरीक्षणशक्ती असायला हवी.
प्राणी अथवा माणसाचे शरीरशास्त्र, त्यांचे हावभाव, दररोजच्या घडामोडींमधील हालचाली अभ्यासता आल्या पाहिजेत. हल्ली बाजारात सॉफ्टवेअर मिळत असले, तरी ही चित्रे हातानेच काढता आली पाहिजे. एखाद्या बातमीवर भाष्य करताना त्यातील मार्मिकपणा तसेच चित्रे यांचा मिलाफ संतुलित असावा.
कल्पना चांगली पण चित्र नीट नसेल तर त्या व्यंगचित्राला महत्त्व राहत नाही. इतरांच्या व्यंगचित्रांचा आपल्यावर प्रभाव असायला हरकत नाही, पण त्यात आपली प्रतिभा व आपल्या गुणांचे प्रतिबिंब उमटले पाहिजे. कुणाच्या शारीरिक व्यंगावर व्यंगचित्र काढू नये. एसेही त्यांनी सांगितले
या कार्यक्रमाचे नियोजन प्रसिद्ध व्यंगचित्रकार विकास सबनीस व संजय मिस्त्री यांनी केले होते. (प्रतिनिधी)
नेहमीच्या राजकीय धावपळीत एक व्यंगचित्रकार म्हणून आपण स्वत:ला हरवल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. व्यंगचित्रकारितेत बाळासाहेब ठाकरे, आर. के. लक्ष्मण, विकास सबनीस यांच्याबरोबरच डेव्हिड लो, वॉल्ट डिस्ने, जॅक डेव्हिस, नॉर्मन रॉकवेल या व्यंगचित्रकारांची व्यंगचित्रे आपण अभ्यासत असतो, असेही त्यांनी नमूद केले.