मुंबई - खार रेल्वेस्थानक परिसरातून मंगळवारी (24 एप्रिल) देशी कट्टे आणि काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. खारमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला असून याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चेतन चंदू पटेल (२९) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्याकडून दोन देशी कट्टे आणि चार जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. त्याने ही शस्त्र कुठून आणली तसेच कोणाला देण्यासाठी आणली होती याबाबत खारचे पोलीस निरीक्षक दया नायक, पोलीस उपनिरीक्षक काटकर चौकशी करत आहेत.
सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल आणि तीन काडतुसे हस्तगत
काही दिवसांपूर्वी गस्ती दरम्यान पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला अटक केल्याची घटना कल्याणमध्ये घडली होती. रवी दाढी असे या गुन्हेगाराचे नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून पिस्तूल व तीन जिवंत काडतूस हस्तगत केले होते. रवी दाढी विरोधात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
कोळशेवाडी पोलिसाचे पथक गस्ती घालत असताना विजयनगर समोरील मैदानात रवी दाढी हा पिस्तूल सारखे हत्यार घेऊन गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने उभा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली व. पो. नि. शाहूराज साळवे यांच्या सुचनेप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक विलास नलावडे, पोहवा शिर्के, दहिफळे, श्रीवास, पो.ना. जमादार भोजणे, जाधव या पोलिसांच्या पथकाने तत्काळ त्या ठिकाणी धाव घेत सापळा रचत रवी दाढीला अटक केली होती. त्याच्याकडून एक पिस्तूल व तीन जिवंत काडतूस हस्तगत केले आहेत. कोळसेवाडी पोलीस स्थानकात रवी विरुद्ध ६ गुन्हे दाखल असून यापैकी तीन प्रकरणात तो फरार होता. रवी या परिसरात नेमक्या कोणत्या उद्देशाने आला होता याचा तपास पोलीस करत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्तांनी दिली होती.