मुंबई : अभिनेत्री कंगना रानौतच्या वांद्रे, पाली हिल येथील कार्यालयातील बेकायदा बांधकामांवर केलेल्या कारवाईचा वाद न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. सत्ताधारी शिवसेनेसाठी हा प्रतिष्ठेचा प्रश्न असल्याने या प्रकरणात महापालिकेची बाजू मांडण्यासाठी वकील ॲस्पी चिनाॅय यांची नियुक्ती करण्यात आली. महापालिकेने त्यांना आतापर्यंत तब्बल ८२ लाख रुपये मानधनापोटी दिल्याची माहिती उजेडात आली आहे.कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केली होती. त्यामुळे शिवसेनाविरुद्ध कंगना असा वाद रंगला होता. दरम्यान, याच काळात महापालिकेने पाली हिल येथील काही बंगल्यांची पाहणी करून तेथील बेकायदा बांधकामप्रकरणी नोटीस बजावली होती. कंगनाच्या बंगल्यात १४ नियमबाह्य बांधकामे आढळून आल्याने महापालिकेने २४ तासांतच त्यावर हातोडा मारला. याचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटून महापालिका आणि शिवसेनेवर टीकास्त्र सोडण्यात आले होते.कंगनाने या प्रकरणी न्यायालयात धाव घेतल्याने सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. या प्रकरणी मुंबई महापालिकेने कोणत्या वकिलाची नियुक्ती केली? त्यांना किती रक्कम अदा करण्यात आली? याची माहिती माहिती अधिकार कार्यकर्ते शरद यादव यांनी पालिकेकडे मागितली होती. यास पालिकेच्या विधि विभागाने दिलेल्या उत्तरानुसार २२ सप्टेंबरपर्यंत २२ लाख ५० हजार रुपये, तर ७ ऑक्टोबरपर्यंत ६० लाख रुपये असे एकूण ८२ लाख ५० हजार रुपये दिले असल्याचे स्पष्ट केले.
अभिनेत्री कंगनाप्रकरणी पालिकेने वकिलाला मोजले ८२ लाख
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2020 7:03 AM