लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख हे आर्थर रोड कारागृहातून बाहेर येताच पदाधिकाऱ्यांनी गर्दी करत त्यांचे जल्लोषात स्वागत केले. मात्र, बेकायदेशीर जमाव केल्याप्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी पदाधिकाऱ्यांसह एकूण १०० जणांविरोधात गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला आहे.
देशमुख यांच्या स्वागतासाठी त्यांच्या कुटुंबीयांसोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आर्थर रोड कारागृहाबाहेर घोषणा देत फुलांचा वर्षाव केला होता. याप्रकरणी पोलिसांनी आर्थर रोड कारागृहाच्या बाहेरील साने गुरुजी मार्गावर बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास राष्ट्रवादी युवक काँग्रेस मुंबईचे अध्यक्ष ॲड. नीलेश भोसले, सचिन नारकर, अजयकुमार यादव, अनिल कदम, नरेंद्र राणे, सोहिल सुभेदार, महेंद्र पानसरे, अजित रावराणे, गुरदीप सिंग किर आणि मणिशंकर चव्हाण यांच्यासह अन्य १०० अनोळखी व्यक्तींनी एकत्र येऊन बेकायदेशीर जमाव जमवून विनापरवाना स्वागत सत्काराचा कार्यक्रम आयोजित केल्याचा गुन्हा नोंद केला आहे. ना. म. जोशी मार्ग पोलिस ठाण्यातील पोलिस शिपाई विवेक राऊत यांनी पोलिसांतर्फे फिर्याद नोंदविली.
नोटिशीकडे दुर्लक्ष...
अनिल देशमुख यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे आर्थर रोड कारागृह ते सिद्धिविनायक मंदिर अशी बाइक रॅली काढण्यात येणार असल्याची माहिती मिळताच ना. म. जोशी मार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील चंद्रमोरे यांनी २८ डिसेंबरलाच कलम १४९ प्रमाणे ॲड. नीलेश भोसले यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावली होती. यामध्ये, बाइक रॅलीच्या मार्गावर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, तसेच सार्वजनिक किंवा खासगी मालमत्तेचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे ज्याद्वारे दखलपात्र किंवा अदखलपात्र गुन्हा तसेच सार्वजनिक शांततेस बाधा निर्माण होईल, असे कोणतेही कृत्य आपण किंवा आपल्या कार्यकर्त्यांमार्फत करू नये. तसेच बाइक रॅली काढू, असे नोटिसीमध्ये स्पष्ट केले होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"