मुंबईत फटाके फोडणाऱ्या ८०६ जणांविरुद्ध गुन्हा; पोलिसांकडून ७३४ जणांवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2023 07:04 PM2023-11-13T19:04:24+5:302023-11-13T19:05:49+5:30
मुंबईत दिवाळीच्या निमित्ताने फटाके फोडताना अनेक ठिकाणी उच्च न्यायालयाच्या निर्देशाचे उल्लंघन करण्यात आले आहे.
मुंबई - देशभरात दिवाळीची धूम पाहायला मिळत आहे. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत घरोघरी दिवाळीचा उत्साह आणि आनंद दिसून येत आहे. गरीब, श्रीमंत, सर्वसामान्यांपासूनत ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण दिवाळी मोठ्या उत्साहाने साजरी करत आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही सीमा रेषेवरील सैन्य जवानांसोबत दिवाळी साजरी केली. दिवाळीच्या आनंदात मिठाईचं वाटप, फराळाची मेजवाणी आणि फटाक्यांची आतषबाजी होत आहे. मात्र, मुंबईतील वायू प्रदुषणाच्या पार्श्वभूमीवर हायकोर्टाने फटाके उडवण्यासाठी ठराविक वेळेची मर्यादा घालून दिली आहे.
मुंबईत दिवाळीच्या निमित्ताने फटाके फोडताना अनेक ठिकाणी उच्च न्यायालयाच्या निर्देशाचे उल्लंघन करण्यात आले आहे. त्यामुळे, पोलिसांनी फटाके फोडणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात ७८४ खटले दाखल करण्यात आले असून ८०६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे हा गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हे दाखल झालेल्या ८०६ पैकी ७३४ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
Mumbai Police has registered 784 cases against 806 persons for violation of Bombay High Court orders on crackers and air pollution. Out of these 806 persons, penal action was taken against 734 persons.
— ANI (@ANI) November 13, 2023
Bombay High Court had allowed bursting of firecrackers only between 8 pm to…
दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने दिवाळीनिमित्त रात्री ८ ते १० या वेळेतच फटाके फोडण्यास परवानगी दिली आहे. मात्र, या वेळेशिवायही मुंबईतील अनेक भागात फटाके फोडण्यात येत आहेत. त्यामुळे, पोलिसांकडून कारवाई करत गुन्हे दाखल केले जात आहेत.