Join us

किशोरी पेडणेकरांच्या कंपनीविरोधात गुन्हा; कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधीची रक्कम जमा न केल्याचे उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 9:43 AM

कंपनीचे संचालक प्रशांत महेश गवस, शैला प्रशांत गवस, गिरशी रमेश रेवणकर यांच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी कुलाबा पोलिस ठाण्यातील दाखल गुन्ह्याचा तपास सुरू असतानाच, एन. एन. जोशी मार्ग पोलिस ठाण्यात माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या एम/एस किश कॉर्पोरेट सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

कंपनीचे संचालक प्रशांत महेश गवस, शैला प्रशांत गवस, गिरशी रमेश रेवणकर यांच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भविष्य निर्वाह निधी संघटन अंमलबजावणी अधिकारी विद्या बाबर (४५) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.  त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ज्या कंपनीत २० पेक्षा जास्त कर्मचारी काम करतात, त्या कंपनीत भविष्य निर्वाह निधीचा कायदा लागू होतो.

लोअर परळ येथील  एम/एस किश कॉर्पोरेट सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत २० पेक्षा जास्त कामगार काम करत आहेत.  संबंधित कंपनीने बेस्ट कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचे पैसे जमा केले नसून ते त्यांना मिळवून देण्याबाबत किरीट सोमय्यांनी अर्ज केला. त्यानुसार केलेल्या चौकशीत, कंपनीने ऑक्टोबर व नोव्हेंबर २०२१ मधील कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधीची रक्कम जमा केली नसल्याचे दिसून आले. 

पेडणेकर काय म्हणाल्या होत्या?

किशोरी पेडणेकर यांनी यापूर्वी दिलेल्या माहितीत तीन महिलांनी एकत्र येत किश कंपनी सुरू केली. मात्र, त्याकडे वेळ देता न आल्याने २०१३ मध्ये कंपनी सोडली असल्याचे सांगितले होते. 

टॅग्स :किशोरी पेडणेकरपोलिस