मुंबई : जानेवारी महिन्यात मीरा-भाईंदर येथे झालेल्या जातीय हिंसाचारावेळी भाजप आमदार नितेश राणे आणि गीता जैन यांनी प्रक्षोभक भाषणे केल्याचे आढळून आल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी उच्च न्यायालयाला मंगळवारी दिली.
गेल्या आठवड्यात उच्च न्यायालयाने दोन्ही नेत्यांनी केलेली भाषणे आक्षेपार्ह आणि प्रक्षोभक होती का? याची वैयक्तिक पडताळणी करण्याचे आदेश पोलिस आयुक्तांना दिले होते. न्यायालयाने पुढील सुनावणी १९ जून रोजी ठेवली आहे. जानेवारी महिन्यात मीरा-भाईंदर येथे झालेल्या जातीय दंगलीत राणे आणि जैन यांनी केलेली भाषणे आक्षेपार्ह होती, असे प्राथमिक पडताळणीतून दिसून येत असल्याची माहिती मुख्य सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी न्या. रेवती मोहिते डेरे व न्या. मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाला सांगितले.
मीरा-भाईंदर येथे उसळलेल्या जातीय दंगली संदर्भात १३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अन्य लोकही आरोपी आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू आहे, अशी माहितीही वेणेगावकर यांनी न्यायालयाला दिली. जानेवारीमध्ये मीरा भाईंदर येथे दंगल उसळल्यानंतर येथे नितेश राणे, गीता जैन आणि टी राजा यांनी प्रक्षोभक भाषण करूनही पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याबद्दल येथील काही रहिवाशांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मालवणी, मानखुर्द आणि घाटकोपर भागातील सभांमध्ये द्वेषपूर्ण भाषणे केल्याचा आरोप राणेंवर आहे. जैन यांनी मीरा-भाईंदर येथे द्वेषपूर्ण भाषण केल्याचा आरोप आहे, अशी माहिती वेणेगावकर यांनी न्यायालयाला दिली.