मुंबई :
कोविड केंद्राच्या कंत्राटातील कथित गैरव्यवहाराप्रकरणी शिवसेना नेते व राज्यसभा खासदार संजय राऊत यांचे व्यावसायिक मित्र सुजित पाटकर यांच्यासह आणखी तिघांविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी याप्रकरणी ३८ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे. त्यामुळे पाटकर यांच्या अडचणीत भर पडली आहे.
पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांच्यावर ईडीने केलेल्या अटकेच्या कारवाईनंतर पाटकरही चौकशीच्या फेऱ्यात आहेत. सोमय्यांनी केलेल्या तक्रारीनुसार, मे. लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस फर्मचे भागीदार यांनी त्यांना वैद्यकीय सेवा पुरविण्याबाबत अनुभव असल्याचे खोटे भासवून पीएमआरडीए व बृहन्मुंबई महानगर पालिका येथे खोटे व बनावट कागदपत्रे सादर करून, जम्बो कोविड सेंटर येथे वैद्यकीय सेवा पुरविण्याबाबत कंत्राट प्राप्त करून शासनाची फसवणूक केली. मुंबईतील वरळी, दहिसर, महालक्ष्मी रेसकोर्स, मुलुंड, पुण्याच्या जम्बो कोविड सेंटरचे कॉन्ट्रॅक्ट मिळवले होते. त्यांच्या अक्षमतेमुळे अनेक कोविड रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे.
याप्रकरणी लाइफलाइन हॉस्पिटलच्या व्यवस्थापन सेवेसह डॉ. हेमंत गुप्ता, सुजित पाटकर, संजय शहा आणि राजू साळुंखे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मार्च २०२२ मध्ये सोमय्या यांनी न्यायालयातही अर्ज केला होता.
कंत्राटही केले होते रद्द ... पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमध्ये मे. लाइफलाइनच्या फर्मकडून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला असून कोविड सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या झालेल्या मृत्यूमध्ये एका पत्रकारांचाही समावेश होता. पुणे महानगर पालिका व शासनाने कमिटी मार्फत केलेल्या चौकशीत, मे. लाइफलाइनमध्ये कोणताच वैद्यकीय सेवा पुरविण्याचा अनुभव नाही. पुरेसा स्टाफ नाही तसेच एमडी डॉक्टरऐवजी ज्युनिअर इंटरशिप डॉक्टर नेमल्याचे व कंत्राटामधील अटी व शर्तींचा भंग केल्याचे निदर्शनास आले.कंपनी नवीन असून तिला अनुभव नसतानाही कंत्राट दिल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने ९ सप्टेंबर २०२० रोजी नोटीस काढून मे. लाइफलाइनला बदली करून त्यांची २५ लाख रुपयांची अनामत रक्कम जप्त केली. इतर कोणतेही कंत्राट न देण्याचे आदेशही काढले. तरीदेखील मुंबईत त्यांना कंत्राट दिल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे.