शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी एका महिलेविरुद्ध खंडणी, फसवणूक आणि सार्वजनिक प्रतिमा बदनाम केल्याप्रकरणी साकीनाका पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यांनी याप्रकरणी अंधेरी मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टात धाव घेतल्यावर साकीनाका पोलिसांना महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
शेवाळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची फेब्रुवारी २०२० मध्ये जवळच्या मैत्रिणीमार्फत रिंकी गोडसन बाक्सला नावाच्या महिलेशी भेट झाली. शेवाळे यांना ती एक व्यावसायिक महिला असल्याचे सांगण्यात आले, परंतु कोविड-१९ मुळे तिचा व्यवसाय ठप्प झाला होता आणि तिला काही आर्थिक मदतीची गरज होती. ती त्यांना भेटण्यासाठी मेसेज आणि फोन कॉल्स करत होती. काही महिन्यांनंतर शेवाळे यांनी महिलेला आर्थिक मदत केली, मात्र नंतर ती आणखी पैशांची मागणी करू लागली, असे तक्रारीत त्यांनी नमूद केले आहे.
माझा मदतीचा स्वभाव असल्याने आरोपीने त्याचा गैरफायदा घेतला आणि अधिक पैशांसाठी दबाव आणण्यास सुरुवात केली. मी आरोपीला नम्रपणे नाही म्हणण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने माझ्याकडून आणखी पैसे हडप केले. त्यानंतर तिने मला धमकावणे आणि ब्लॅकमेल करणे सुरू केले.
मी नकार दिल्यावर तिने माझ्याशी अवैध संबंध असल्याचे दाखवून बदनामी करण्याची धमकी दिली. शेवाळे यांच्याकडून मोठ्या प्रमाणात खंडणी घेतल्यानंतर, महिलेने सोशल मीडियावर आपले त्यांच्याशी संबंध असल्याचे सांगण्यास सुरुवात केली आणि शेवाळे यांना धमकी दिली की त्यांनी त्यांच्या पत्नीला घटस्फोट देऊन तिच्याशी लग्न केले तरच ती हे सर्व प्रकार थांबवेल.
- तक्रारीनुसार, खासदार शेवाळे यांनी आतापर्यंत महिलेला ५६ लाख रुपये दिले आहेत आणि आयफोन १२ सह भेटवस्तूदेखील दिल्या आहेत.
- परंतु, तिने केवळ जास्त पैसे उकळण्यास सुरुवात केली नाही, तर सोशल मीडियावर त्यांची प्रतिमादेखील डागाळण्याचा प्रयत्न करत त्यांना इजा पोहोचविण्याचीही धमकी दिली.
- न्यायालयाच्या निर्देशानुसार, साकीनाका पोलिसांनी ११ जुलै रोजी महिलेविरुद्ध खंडणी, फसवणूक आणि बदनामी केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.