आठवले धक्काबुक्की प्रकरणात जबाब नोंदविण्याचे काम सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 05:17 AM2018-12-11T05:17:48+5:302018-12-11T05:18:12+5:30
घटनास्थळी नेमके काय घडले, याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न पोलिस करीत आहेत.
अंबरनाथ: केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना झालेल्या धक्काबुक्की प्रकरणात पोलिसांनी घटनास्थळी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांचे जबाब नोंदविण्याचे काम सुरू केले आहे. आरोपी प्रवीण गोसावी रुग्णालयात असल्याने त्याची चौकशी अद्याप केली नाही. मात्र घटनास्थळी नेमके काय घडले, याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न पोलिस करीत आहेत.
गोसावीवर मुंबईच्या रु ग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचार पूर्ण झाल्यावर पोलीस त्याला अटक करतील. घटनेच्या दिवशीची चौकशी स्थानिक पातळीवर सुरू आहे. आयोजक आणि आरपीआय आठवले गटाचे अध्यक्ष अजय जाधव यांचा जबाब पोलिसांनी नोंदवला आहे. आरपीआयने गोसावीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
या घटनेचा निषेध होत असताना काही आंबेडकरवादी नेत्यांनी आठवले यांना आत्मपरीक्षणचा सल्ला दिला. आठवले यांच्यासोबत असे प्रकार का होतात, याचा विचार करण्याची गरज असल्याची प्रतिक्रीया रिपाई सेक्युलर गटाचे जिल्हाध्यक्ष श्याम गायकवाड यांनी व्यक्त केली.
भूमिकेला विरोध कायम
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोसावी रूग्णालयात भरती असतानाही आठवले यांच्या भूमिकेला विरोध करीत असल्याचे समजते. आठवले यांनी आंबेडकरी विचारांना जातीयवादी पक्षाच्या ताब्यात दिल्याचा त्याचा आरोप आहे. याच संतापातून त्याने आठवले यांना मारहाण केल्याचे बोलले जात आहे.