मुंबई : ११ जुलै २००६ रोजी मुंबईतील उपनगरीय लोकलमध्ये सात बॉम्बस्फोट करून १८९ लोकांचा जीव घेणाऱ्या आणि ८१७ जणांना जखमी करणाऱ्या १२ दोषींचा आज ‘फैसला’ होणार आहे. या निकालासाठी पीडित, त्यांचे नातेवाईक आणि सामान्य मुंबईकरांना तब्बल नऊ वर्षे प्रतीक्षा करावी लागली आहे. या दोषींना फाशी होणार की जन्मठेप, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.या बॉम्बस्फोटाप्रकरणी दहशतवाद प्रतिबंधक पथकाने (एटीएस) १३ जणांना अटक केली. विशेष मोक्का न्यायालयाने ११ सप्टेंबर २०१५ रोजी १३पैकी १२ आरोपींना दोषी ठरवले व एकाची निर्दोष सुटका केली. बचावपक्षाच्या वकिलांनी दोषींना कठोर शिक्षेपासून वाचवण्यासाठी न्या. वाय.डी. शिंदे यांना दोषींच्या कुटुंबीयांची स्थिती, आर्थिक स्थिती, प्रकृती आणि अन्य बाबींचा विचार करूनच शिक्षा देण्यात यावी, अशी विनंती केली. तर विशेष सरकारी वकील राजा ठाकरे यांनी त्यावर आक्षेप घेतला. त्यांनी आठ आरोपींना फाशीची शिक्षा तर उर्वरित चार जणांना मरेपर्यंत जन्मठेप ठोठावण्यात यावी, अशी मागणी विशेष न्यायालयाकडे केली. --------आरोपींची संख्या, साक्षी-पुरावे आणि सर्वोच्च न्यायालयाने खटल्यास दिलेली स्थगिती, या सर्व बाबींमुळे हा खटला संपण्यास नऊ वर्षे वाट पाहावी लागली. गेल्या वर्षी १९ आॅगस्ट रोजी विशेष न्यायालयाने खटल्याचे कामकाज संपवून निकाल राखून ठेवला होता. प्रत्यक्षात निकाल लागेपर्यंत आणखी एक वर्ष गेले आहे. दोषींना फाशीच व्हावी, अशी मागणी पीडित व त्यांचे नातेवाईक करीत आहेत. > यांना फाशी द्या... कमल अहमद अन्सारी, डॉ. तन्वीर अहमद अन्सारी, मोहम्मद फैझल शेख, एहतेशाम सिद्दिकी, शेख आलम शेख, मोहम्मद साजीद अन्सारी, नावेद हुसेन खान आणि असीफ खान यांना जन्मठेप हवी... मोहम्मद माजीद शफीक, मुझम्मिल शेख, सोहेल शेख आणि जमीर अहमद शेख.
बॉम्बस्फोट प्रकरणी आज निकाल
By admin | Published: September 30, 2015 2:01 AM