Join us  

इमारत कोसळल्याप्रकरणी गुन्हा दाखल होणार

By admin | Published: May 02, 2016 1:00 AM

कामाठीपुरा परिसरात शनिवारी तीन मजली इमारत कोसळून ६ जणांचा बळी गेला. तर दोन जण जखमी झाले. या प्रकरणी दोषींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी संबंधित यंत्रणेकडून अहवाल

मुंबई : कामाठीपुरा परिसरात शनिवारी तीन मजली इमारत कोसळून ६ जणांचा बळी गेला. तर दोन जण जखमी झाले. या प्रकरणी दोषींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी संबंधित यंत्रणेकडून अहवाल मागविला आहे. अहवालाच्या पडताळणीतून पालिका, म्हाडा तसेच संबंधित प्रशासनातील दोषींविरुद्ध गुन्हा दाखल करत कारवाई करण्यात येईल, असे नागपाडा पोलिसांकडून सांगण्यात आले.कामाठीपुरा १४व्या गल्लीत इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत जखमी झालेल्या एकावर जे.जे. रुग्णालयात तर दुसऱ्यावर नायर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली. कोलीन मुल्ला या जखमीवर जेजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याला फ्रॅक्चर झाले असून, त्याची प्रकृती आता स्थिर आहे, असे जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले. मोहम्मद जेकरी या जखमीवर नायर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्यावर शनिवारी ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचार सुरू होते. येथे त्याची प्रकृती स्थिर करण्यात आली. त्यानंतर आता त्याला वॉर्ड क्रमांक ९मध्ये हलवण्यात आले आहे, असे नायर रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. तर शनिवारी घटना घडल्यानंतर जेजेत दाखल करण्यात आलेल्या चार जणांचा मृत्यू झाला असून, नायर रुग्णालयात दोन जखमींना दाखल करण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, ६ मृतदेहांपैकी अद्यापही एका मृतदेहाची ओळख पटलेली नाही. महापालिका नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी ७ वाजेपर्यंत घटनास्थळावरील कोसळलेल्या इमारतीचे साहित्य आवश्यक साधनांद्वारे उचलण्यात आले होते. रविवारी सुरक्षेच्या कारणात्सव येथे आवश्यक पोलीस तैनात करण्यात आले असून, महापालिकेसह म्हाडा प्राधिकरणाकडून मात्र पुढील काहीच कारवाई करण्यात आलेली नाही. (प्रतिनिधी)