Join us

भायखळा जेल मृत्यू प्रकरण, सहा पोलिसांवर आरोप निश्चिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 6:08 AM

मंजुळा शेट्ये मृत्यूप्रकरणी सत्र न्यायालयाने भायखळा कारागृहाच्या सहा पोलिसांवर मंगळवारी आरोप निश्चित केले.

मुंबई : मंजुळा शेट्ये मृत्यूप्रकरणी सत्र न्यायालयाने भायखळा कारागृहाच्या सहा पोलिसांवर मंगळवारी आरोप निश्चित केले.सत्र न्यायालयाचे न्यायाधीश शायना पाटील यांनी आरोपी मनीषा पोखरकर, हवालदार बिंदू नाईकडे, वसीमा शेख, शितप शेगावकर, सुरेखा गुळवे आणि आरती शिंगणे या सहा जणींविरुद्ध भारतीय दंडसंहिता कलम ३०२ (हत्या), १२० (ब) (कट रचणे), २०१ ( पुरावे नष्ट करणे) आणि ५०६ (दहशत निर्माण करणे) अंतर्गत आरोप निश्चित केले. या सर्व आरोपींना गेल्या वर्षी १ जुलै रोजी अटक करण्यात आली होती. आता १३ जुलै रोजी या प्रकरणाचा खटला सुरू होईल, असे न्यायाधीशांनी सांगितले.मंजुळा शेट्ये (४५) भायखळा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होती. २३ जूनला कारागृहाच्या महिला कर्मचाऱ्यांनी तिला मारहाण केली. दोन अंडी आणि पाच पावांचा हिशेब न देऊ शकल्याने मंजुळा आणि कारागृह कर्मचाºयांमध्ये वाद निर्माण झाला. तो इतका शिगेला पोहोचला की, महिला पोलिसांनी तिचा मृत्यू होईपर्यंत मारहाण केली. सुरुवातीला कारागृह प्रशासनाने तिची तब्येत ठीक नसल्याने तिचा मृत्यू झाल्याचा दावा केला. तिच्या मृत्युप्रकरणी सहकैद्यांनी पोलीस तक्रार केल्यानंतर व प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचल्याने पोलिसांनी दखल घेत सहा महिला पोलिसांना अटक केली व त्यानंतर त्यांच्यावर दोषारोपपत्र सादर केले.