केस वर्ग करण्याचा ईडीचा अर्ज फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 04:27 AM2018-07-19T04:27:12+5:302018-07-19T04:27:32+5:30
पंजाब नॅशनल बँकेशी संबंधित सर्व केसेस विशेष पीएमएलए न्यायालयात वर्ग कराव्यात, अशी विनंती करणारा सक्तवसुली संचालनालयाचा (ईडी) अर्ज विशेष सीबीआय न्यायालयाने बुधवारी फेटाळला.
मुंबई : पंजाब नॅशनल बँकेशी संबंधित सर्व केसेस विशेष पीएमएलए न्यायालयात वर्ग कराव्यात, अशी विनंती करणारा सक्तवसुली संचालनालयाचा (ईडी) अर्ज विशेष सीबीआय न्यायालयाने बुधवारी फेटाळला.
पीएनबी घोटाळ्याची केस विशेष सीबीआय व विशेष पीएमएलए न्यायालयात सुरू आहे. या केसमधील आरोपी व साक्षीदार तेच असल्याने ईडीचे वकील हितेन वेणेगावकर यांनी ही केस विशेष पीएमएलए न्यायालयाकडे वर्ग करावी, अशी विनंती करणारा अर्ज २७ जून रोजी विशेष सीबीआय न्यायालयात केला. त्यावरील सुनावणीत वेणेगावकर यांनी न्यायालायाला सांगितले की, या केसमधील आरोपी आणि साक्षीदार सारखेच आहेत. पीएमएलए कायद्यातील कलम ४४ (१) अंतर्गत विशेष न्यायालयाला दोन्ही केसेस (सीबीआय व ईडी) चालविण्याचा अधिकार आहे. पीएमएलए कायद्यांतर्गत विशेष न्यायालयाला जास्त अधिकार देण्यात आल्याने पीएनबी घोटाळ्याची केस विशेष पीएमएलए न्यायालयात वर्ग करावी, अशी विनंती विशेष सीबीआय न्यायालयाला केली. मात्र, विशेष सीबीआय न्यायालयाने त्यांचा हा अर्ज फेटाळला. हेही विशेष न्यायालय असल्याने मला ही केस विशेष पीएमएलए न्यायालयाकडे वर्ग करण्याची गरज वाटत नाही, असे म्हणत न्यायाधीशांनी अर्ज फेटाळला.
विशेष सीबीआय न्यायालयाच्या या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देऊ, असे ईडीचे वकील हितेन वेणेगावकर यांनी सांगितले.