मुंबई : मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुंबईचे सह पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांची भेट घेत डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणाची सविस्तर चर्चा केली. यात दोषी असलेल्यांना त्वरीत अटक करून फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवावा, अशी मागणी करण्यात आली. त्यानंतर मुंबई काँग्रेसतर्फे नायर रुग्णालयावर मोर्चा काढण्यात आला.मुंबई काँग्रेसच्या शिष्टमंडळामध्ये अध्यक्ष मिलिंद देवरा, माजी खासदार एकनाथ गायकवाड, आमदार भाई जगताप, नसीम खान, अमीन पटेल, वर्षा गायकवाड, चरण सिंग सप्रा, मधू चव्हाण, कृपाशंकर सिंग, बाबा सिद्दीकी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.या वेळी मिलिंद देवरा म्हणाले, डॉ. पायल तडवी यांच्याबाबत घडलेला प्रकार निंदनीय आहे. तडवी कुटुंबियांना त्वरीत न्याय मिळावा. या प्रकरणात दोषी असलेल्या तिघाही डॉक्टरांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. हा खटला अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत स्थापित करून खटला चालविण्यास अनुभवी आणि उत्तम वकिलांची नियुक्ती करावी, अशी मागणीही देवरा यांनी केली.दरम्यान, इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे डॉ. पायल तडवी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कोणत्याही डॉक्टरचा अशाप्रकारे मृत्यू होणे, ही एक दु:खद, खेदजनक आणि संतापजनक घटना आहे. या घटनेची कायदेशीर चौकशी व्हावी आणि पायल तडवी यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, अशी मागणी सदस्यांनी केली.
फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवा, मुंबई काँग्रेसची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 6:02 AM