मुंबई: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर केलेल्या टीकेच्या संदर्भात निलेश राणे (Nilesh Rane) आणि नितेश राणे (Nitesh Rane) यांच्याविरोधात मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सूरज चव्हाण यांनी शरद पवारांचा संबंध दाऊद इब्राहिमशी जोडल्याप्रकरणी निलेश राणे आणि नितेश राणे या दोघांविरोधात आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारावर राणे बंधूंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीकडून केल्या जाणाऱ्या कारवाईची जोरदार चर्चा सुरू आहे. ईडीने नवाब मलिक यांना अटक केली असून, त्यांना सुरुवातीला ईडी कोठडीनंतर आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असतानाच भाजप नेते निलेश राणे यांनी नवाब मलिक यांच्यासंदर्भात थेट शरद पवारच दाऊदचा माणूस असल्याचा संशय येत असल्याचे विधान केले होते. यानंतर आता राणे बंधूंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्य सरकार कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचे काम करत आहे
राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय, त्याला सरकारच जबाबदार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सहकार्य करण्यास तयार असल्याचे सांगितले आहे. तरीही मुंबईला पोलीस छावणीचे स्वरुप आले आहे, ते कशासाठी, असा सवाल भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. तर, पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यावर बोलताना नितेश राणे म्हणाले की, पोलिसांनी गुन्हा दाखल केला असेल, तर त्यावर अभ्यास करून उत्तर दिले जाईल. आम्ही काय चुकीचे बोललो आहे, आम्ही हिंदुत्वाची बाजू घेतलेली आहे. आम्ही कोणतीही दंगल भडकवण्याचा प्रयत्न केलेला नाही, असे नितेश राणे यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, राणे बंधू नितेश आणि निलेश राणे यांनी जाणीवपूर्वक समाजात तेढ निर्माण केला आहे. शरद पवार यांचे आतंरराष्ट्रीय गुन्हेगार दाऊदशी संबंध असल्याचे वारंवार प्रसारमाध्यमांमध्ये वक्तव्य करत आहेत. राणे बंधू यांनी अनिल देशमुख हिंदू आहेत म्हणून त्यांचा राजीनामा घेतला. तर नवाब मलिक मुस्लिम आहेत म्हणून त्यांचा राजीनामा घेतला जात नाही, असे वक्तव्य केली जात आहेत. शरद पवार यांचा दाऊदशी संबंध आहे, असे वक्तव्य करून शरद पवार याच्या जीवाला धोका निर्माण केला असल्याने राष्ट्रवादीचे नेते सुरज चव्हाण यांनी मरीन ड्राईव्ह पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर मुंबई पोलिसांना यांसंदर्भातील पुराव्याचा पेनड्राइव्ह दिला आहे.