मुंबई : बनावट कागदपत्रांच्या आधारे बँक आॅफ इंडियाला तब्बल ५७.२६ कोटींचा गंडा घातल्याबद्दल भाजपाचे मुंबई प्रदेश सरचिटणीस मोहित कंबोज-भारतीय यांच्यासह पाचजणांविरुद्ध केंद्रीय गुन्हा अन्वेषण शाखेने (सीबीआय ) बुधवारी गुन्हा दाखल केला आहे. त्यांची कार्यालये व निवासस्थानी छापे टाकून कागदपत्रे व बँकचे दस्ताऐवज जप्त केले आहेत.मोहित कंबोज कार्यकारी संचालक असलेल्या एका कंपनीसह दोन खासगी कंपनीच्या माध्यमातून ही फसवणूक करण्यात आली आहे. २०१३ ते २०१८ या कालावधीत बनावट दस्ताऐवजाद्वारे ही रक्कम उकळण्यात आल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे. जितेंद्र गुलशन कपूर, सिद्धात बागला, इरतेश मिश्रा अशी गुन्हा दाखल असलेल्या अन्य संचालकांची नावे आहेत. त्याच्याशिवाय केबीजे हॉटेल्स गोवा प्रायव्हेट लिमिटेड विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.कंबोज यांची बागला ओव्हरसीस प्रायव्हेट कंपनी असून पूर्वी तिचे नाव अवियान ओव्हरसीज लिमिटेड कंपनी असे नाव होते. या कंपनीच्या माध्यमातून कंबोज व त्याच्या साथीदारांनी बँक आॅफ इंडियाच्या दक्षिण मुंबईतील फोर्ट येथील कॉर्पोरट शाखेत व्यवहार सुरु केले. परदेशात मालाची निर्यात होते, त्याठिकाणी मोठे व्यवहार, तसेच देयके असून एफबी खरेदी केली जात असल्याचे त्यांनी बनावट कागदपत्रे सादर केली. त्याद्वारे ६० कोटीपर्यतच्या सुविधा मंजूर करून घेतल्या. २०१३ ते २०१८ पर्यंतच्या कालावधीत त्यांनी याप्रकारे बँकेची एकूण ५७ कोटी २६ लाखाची फसवणूक केली. बँकेच्या लेखा परीक्षणात हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर त्याविरुद्ध सीबीआयकडे तक्रार देण्यात आली. या घोटाळ्यामध्ये बँकेचे काही अधिकारी व कर्मचारी गुंतले असून त्यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घर, कार्यालयांत छापेमंगळवारपासून सीबीआयच्या पथकाने कंबोज यांच्या वांद्रे (प )मधील पाली हिल येथील निवासस्थान, फोर्टमधील कार्यालय आणि अन्य संचालकाची घरे व कार्यालयावर छापा मारला. त्यातून विविध बँकेचे व्यवहार, कागदपत्रे जप्त केली आहेत. त्याची छाननी सुरु आहे.
बँकेला ५७ कोटींचा गंडा, भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 5:16 AM