लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पालिकेची परवानगी न घेता दहिसरच्या जलतरण तलाव परिसरात घुसून त्याचे उद्घाटन आणि फटाके फोडण्याचा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला. याप्रकरणी पालिकेच्या उद्यान विभागाचे उपायुक्त यांच्या निर्देशानुसार माजी आमदार विनोद घोसाळकर, त्यांचा मुलगा अभिषेक व त्याची पत्नी तसेच माजी नगरसेविका तेजस्विनी घोसाळकर यांच्यासह एकूण पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पालिकेच्या दहिसर जलतरण तलावाचा अतिरिक्त कार्यभार हा प्रशासकीय अधिकारी भारत पवार (५१) यांच्याकडे आहे. त्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, हा तलाव १ एप्रिलपासून सामान्यांसाठी खुला करण्यात आला आहे. उद्यान विभागाचे उपायुक्त किशोर गांधी यांनी पवार यांना एक व्हिडीओ क्लिप पाठविली होती. त्यात ३० एप्रिल रोजी रात्री आठ ते दहाच्या सुमारास जलतरण तलावावर विनोद घोसाळकर व त्यांचे कुटुंबीय आणि अन्य कार्यकर्त्यांनी विनापरवाना घुसून पालिकेची परवानगी न घेता लाल फीत कापत २ मे रोजी सुरू होणाऱ्या समर कॅम्पचे उद्घाटन केले.
पवार यांनी क्लिप पाहिल्यावर जलतरण निर्देशक विशाल सागरे यांच्याकडे चौकशी केली. तेव्हा पालिकेने तयार केलेल्या वस्तूंचे किंवा त्या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमांचे उद्घाटन करण्यासाठी पालिका आयुक्त यांना प्रस्ताव सादर करून मंजुरी घेतल्यानंतरच पालिका जनसंपर्क कार्यालयातून उद्घाटनाबाबत पुढील कारवाई करण्यात येते. मात्र, घोसाळकर कुटुंबीयांनी ही प्रक्रिया पूर्ण न करताच परिसरात विनापरवाना घुसले. फटाक्यांची आतषबाजी केली. त्यानुसार या विरोधात पवार यांनी दहिसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आणि घोसाळकर कुटुंबीयांसह एकूण पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.