आमदार रत्नाकर गुट्टे यांच्यावर गुन्हा दाखल, बँकेला घातला ४०९ कोटींचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2023 12:41 PM2023-02-11T12:41:15+5:302023-02-11T12:42:10+5:30
या प्रकरणी सीबीआयने नागपूर येथे दोन ठिकाणी, तर परभणी येथे तीन ठिकाणी नुकतीच छापेमारीदेखील केली होती.
मुंबई : गंगाखेड शुगर ॲण्ड एनर्जी लि. कारखान्यासाठी युको बँकप्रणित पाच बँकांकडून ५७७ कोटी रुपयांचे कर्ज घेत त्या पैशांचा अपहार केल्याप्रकरणी गंगाखेड कारखान्यासह, बँकेचे संचालक आणि गंगाखेड विधानसभा मतदार संघातून राष्ट्रीय समाज पक्षातर्फे निवडून आलेले आमदार रत्नाकर गुट्टे व अन्य संचालक विष्णू अंबाजी मुंडे, कल्पना भागवत गुट्टे, सुनील रत्नाकर गुट्टे, विजय रत्नाकर गुट्टे, सुधामती रत्नाकर गुट्टे यांच्याविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी सीबीआयने नागपूर येथे दोन ठिकाणी, तर परभणी येथे तीन ठिकाणी नुकतीच छापेमारीदेखील केली होती. तसेच, या प्रकरणी मनी लॉड्रिंग झाल्याचा ठपका ठेवत ईडीने (सक्तवसुली संचालनालय) देखील गेल्या डिसेंबरमध्ये त्यांच्याविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर आता सीबीआयने या प्रकरणी स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी दाखल एफआयआरनुसार, गंगाखेड कारखान्याने प्रकल्प उभारणीसाठी युको बँकेच्या नेतृत्वाखाली युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स, आयडीबीआय बँक, इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी यांच्याकडून २००८ ते २०१५ दरम्यान एकूण ५७७ कोटी १६ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. या कर्ज वितरणासाठी काही ठरावीक टप्पे निश्चित करण्यात आले होते. मात्र, कारखान्याने अधिकचे काम दाखवत नियमित टप्प्यांखेरीज कर्जाची उचल केली. यानंतर कारखान्याला तोटा झाला होता व पैसे नसल्यामुळे कंपनीने कर्जाची परतफेड केली नाही, असे दिसून आले.
कर्जाचे पैसे हडपण्याचा हेतू
बँकेने या प्रकरणी कारखान्याच्या आर्थिक व्यवहारांचे फोरेन्सिक ऑडिट केले होते. त्यामध्ये ज्या कारणासाठी कारखान्याने कर्ज घेतले होते, त्यासाठी कर्ज रकमेचा वापर करण्याऐवजी ते पैसे अन्यत्र वळविल्याचा दिसून आल्याचा निष्कर्ष काढला होता. हाही एक प्रमुख मुद्दा सीबीआयने तक्रारीत नमूद केला आहे. तसेच कर्जप्राप्त रकमेचा वापर करताना, ज्या बँकांनी हे कर्ज दिले त्यांच्याऐवजी अन्य बँकांमार्फत व्यवहार केले होते. कारखान्याने कर्जाची परतफेडदेखील नियमित केली नसून देशातील बँकिंग व्यवस्थेचा गैरवापर करत पैसे हडपण्याचा कारखान्याचा व संचालकांचा हेतू असल्याचा ठपका सीबीआयने ठेवला आहे.