ईव्हीएम हॅकिंगचा दावा करणाऱ्या सय्यद शुजाविरुद्ध गुन्हा दाखल; निवडणूक जिंकून देण्याचे नेत्यांना दाखविले होते आमिष
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 05:30 AM2024-12-02T05:30:09+5:302024-12-02T05:30:21+5:30
सायबर पोलिस ठाण्यात शनिवारी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) व आयटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला. दिल्ली पोलिसांतही त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंद आहे.
मुंबई : इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) हॅक करणे शक्य आहे, असा दावा करणाऱ्या सय्यद शुजा याच्याविरोधात निवडणूक आयोगाच्या तक्रारीनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सायबर पोलिस ठाण्यात शनिवारी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) व आयटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला. दिल्ली पोलिसांतही त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंद आहे.
सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत वापरलेल्या ईव्हीएम बनवणाऱ्या टीममध्ये आपणही होतो, असा दावा शुजाने केला होता. एका विशिष्ट प्रणालीचा वापर करून ईव्हीएममध्ये फेरफार केला जाऊ शकतो, असेही त्याने सांगितले होते. काँग्रेसचे माजी नेते कपिल सिब्बल यांनी या दाव्यांचा मुद्दा बनवून ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केले होते.
शुजाने २०१९ मध्येही हाच दावा केला होता
nसय्यद शुजाने २१ जानेवारी २०१९ रोजी लंडनमध्ये इंडियन जर्नालिस्ट असोसिएशनच्या पत्रकार परिषदेतही असाच दावा केला होता. आपण २००९ ते २०१४ पर्यंत इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये काम केल्याचे त्याने सांगितले होते.
nईव्हीएम पूर्णपणे सुरक्षित असून, वायफाय किंवा ब्लूटूथसह कोणत्याही नेटवर्कशी कनेक्ट केले जाऊ शकत नाहीत, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले होते. तसेच, दिल्ली पोलिसांत २०१९ मध्येही निवडणूक आयोगाने शुजाविरोधात तक्रार दाखल केली होती.
अशी होती ऑफर...
१४ नोव्हेंबरला सय्यद शुजाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यात तो महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत वापरण्यात येणारे ईव्हीएम हॅक करू शकतो, असा दावा करत होता. ५३ कोटी रुपये दिले तर मी ६३ जागांचे ईव्हीएम हॅक करू शकतो, अशी ऑफरही त्याने नेत्यांना दिली होती.
अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या तंत्रज्ञानाचा वापर करून आपण ईव्हीएम हॅक करू शकतो, असा दावा त्याने केला होता. आपण अमेरिकेच्या संरक्षण खात्यात कंत्राटावर काम करत असल्याचेही त्याने सांगितले होते. त्याच्या दाव्यानंतर खळबळ उडाली. मात्र, महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी ईव्हीएम हॅकिंगचे दावे खोटे असल्याचे स्पष्ट केले आहे.