मुंबई : सन २०२० ते २०२१ या दोन वर्षात झालेला शिक्षक भरती घोटाळा (टीईटी), सार्वजनिक आरोग्य विभागातील वर्ग-ड श्रेणीतील कर्मचाऱ्यांची भरती तसेच म्हाडामधील कर्मचाऱ्यांच्या भरती प्रकरणी आता ईडीने मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करत चौकशी सुरू केली आहे. ईडीने ईसीआयआर नोंदवत यातील काही तक्रारदारांचा जबाब नोंदविण्याचे काम सोमवारी सुरू केले आहे. कमी गुण मिळालेल्या तब्बल ७८८० उमेदवारांचे गुण वाढवून त्यांना शिक्षक म्हणून भरती केल्याचा घोटाळा २०२० मध्ये उजेडात आला.
पुणे पोलिसांनी याप्रकरणी शिक्षण विभागात उप-सचिवपदी काम केलेल्या आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर यांच्यासह अनेक उच्चपदस्थ सरकारी अधिकाऱ्यांना अटक केली. खोडवेकर यांना निलंबित केले होते. मात्र, गेल्याच आठवड्यात त्यांना पुन्हा सेवेत घेतले असून, उर्वरित महाराष्ट्र वैधानिक मंडळाचे सदस्य-सचिवपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आरोपी तुकाराम सुपेच्या घरातून हार्ड डिस्क जप्त केली होती. काही अधिकाऱ्यांच्या घरातून मोठ्या प्रमाणावर रोकडही जप्त केली होती.
अब्दुल सत्तारांच्या मुलांचाही समावेश?
गैरप्रकार केलेल्या विद्यार्थ्यांच्या यादीत शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या तीन मुली आणि एक मुलगा यांचेही नाव आहे. यातील दोन मुलींची प्रमाणपत्रे रद्द केली आहेत. परंतु, सत्तार यांनी याचे खंडन केले असून हे बदनामीचे षडयंत्र असल्याचे ते म्हणाले. सत्तार यांच्या मुलांची नावे या यादीत आली कशी याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी केली आहे. तर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही याप्रकरणाची पारदर्शकपणे चौकशी करण्याची मागणी केली आहे.