मुंबई : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते भिडल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जवळपास तीन-साडेतीन तास शिवाजी पार्क परिसरात गोंधळ सुरू होता. अखेर पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची समजूत काढत स्मृतिस्थळ परिसर रिकामा केला.
या प्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी ५० ते ६० अनोळखी व्यक्तींविरोधात दंगलीचा गुन्हा नोंदवला असून, अधिक तपास सुरू आहे. स्मृतिस्थळावर नेमके काय घडले याबाबत परिसरातील सीसीटीव्ही आणि रेकॉर्डिंगवरून चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. सायंकाळी सातच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिंदे गटाचे स्थानिक आमदार सदा सरवणकर, शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के, शीतल म्हात्रे आदी स्मृतिस्थळावर अभिवादन करण्यासाठी दाखल झाले होते.
काही वेळाने शिवसेना ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी घोषणाबाजी केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी महिला कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी केला. ठाकरे गटाने घोषणाबाजी, धक्काबुक्कीला सुरुवात केली असल्याचे म्हात्रे यांनी म्हटले. शिंदे गटाने केलेले आरोप ठाकरे गटाने फेटाळून लावले आहेत. या प्रकरणी पोलिसांनीच फिर्यादी होत गुन्हा नोंदवला आहे. घटनास्थळी बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांनीही रेकॉर्डिंग केले आहे. त्याच, रेकॉर्डिंगच्या आधारे गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू आहे. या प्रकरणात सीसीटीव्ही आणि रेकॉर्डिंगच्या मदतीने सर्वांची ओळख पटवून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.