एसीबीची कारवाई; पाच वर्षांपूर्वीचे लाच प्रकरण पुन्हा चर्चेत
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : तरुणीच्या हत्येप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आक्रमकपणे मागणी करणाऱ्या भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरुद्ध बेहिशेबी मालमत्ता जमविल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा दाखल केला आहे. दिनांक १२ डिसेंबर २००६ ते ५ जुलै २०१६ या कालावधीत त्यांनी ज्ञात उत्पनापेक्षा तब्बल ९० टक्के अतिरिक्त मिळकत मिळवल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. मुंबई एसीबीने १२ फेब्रुवारीला दाखल केलेल्या या गुन्ह्यात किशोर वाघ यांच्यावर पुन्हा अटकेची टांगती तलवार कायम आहे.
किशोर वाघ हे परळ येथील महात्मा गांधी स्मारक रुग्णालयात वैद्यकीय अभिलेख ग्रंथपाल म्हणून कार्यरत असून, ४ लाखांची लाच स्वीकारल्याप्रकरणी ‘एसीबी’ने ५ जुलै २०१६ रोजी त्यांच्यासह वैद्यकीय अधिकारी व अन्य एक खासगी व्यक्ती अशा तिघांना अटक केली होती. त्याचदिवशी अधिकाऱ्यांनी त्यांच्या क्वाॅर्टर्सची झडती घेतली होती. वाघ यांना विभागातून निलंबित करण्यात आले होते.
‘एसीबी’ने नियमानुसार वाघ यांच्या मागील १० वर्षांचे विविध मार्गांचे उत्पन्न आणि मालमत्ता यांची सखोल चौकशी केली. त्यामध्ये त्यांची एक कोटीहून अधिक मिळकत आहे. मुंबई, नाशिक व पुणे येथे मालमत्ता असून, ज्ञात उत्पन्नापेक्षा ९० टक्के मिळकत अधिक असल्याचे तपासातून समाेर आले. त्यामुळे मुंबई एसीबीचे सहाय्यक आयुक्त नवनाथ जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.
.......................