Mumbadevi Assembly constituency : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे २० दिवस उरले आहेत. अशातच शिवसेनेचे उद्धव गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी एकनाथ शिंदे यांनी केलेल्या एका विधानावरुन नवा वाद सुरु झाला आहे.अरविंद सावंत यांनी मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील शिंदे गटाच्या उमेदवार शायना एनसी यांच्या विरोधात वादग्रस्त विधान केल्याने खळबळ उडाली आहे. अरविंद सावंत यांनी शायना एनसी यांना 'इम्पोर्टेड माल' म्हटल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे आता शायना एनसी यांनी अरविंद सावंत यांच्यावर आपला अपमान केल्याचा आरोप केला आहे. शायना एनसी यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली असून शिंदे गटाने अरविंद सावंत यांना अटक करण्याची मागणी केली आहे.
खासदार अरविंद सावंत यांनी शिंदे गटाच्या उमेदवार शायना एनसी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. अरविंद सावंत यांनी शिंदे गटाकडून शायना निवडणूक लढविण्यावर प्रश्न उपस्थित करत, इम्पोर्टेड माल येथील निवडणुकीत चालत नाही, असं म्हटलं. अरविंद सावंत यांच्या या विधानावरून वाद वाढला असून याला प्रत्युत्तर म्हणून शायना एनसी यांनी मी एक महिला आहे, वस्तू नाही, असं प्रत्युत्तर दिलं आहे. त्यानंतर आता अरविंद सावंत यांच्याविरोधात नागपाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शायना एनसींच्या या तक्रारीनंतर आता अरविंद सावंत यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे.
"मी काय विधान केलं आहे ते आधी पहा. माझ्या विधानातील त्यांचं नावच घेतले नाही. इथे आमचे महाविकास आघाडीचे उमेदवार उभे आहेत. मी म्हटलं इथे बाहेरचे उमेदवार चालणार नाहीत. इम्पोर्टेड माल चालणार नाही. याचा त्रास तुम्हाला का झाला. याच्यामध्ये कोणता शब्द चुकीचा आहे. गोंधळ निर्माण करण्याची त्यांची सवय आहे. प्रियंका गांधी यांनी त्यांची नीती किती खालच्या पातळीची आहे सांगितलं होतं. तेव्हा त्यांनी प्रियांका गांधींवर माझी जात काढल्याचा आरोप केला होता," असं अरविंद सावंत म्हणाले.
"पंतप्रधान मोदींनी ७५ हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्या आरोप केला होता त्याचं काय झालं. ज्या व्यक्तीवर आरोप लावला त्याला सन्मानित केला गेला त्याला अर्थमंत्री बनवलं. ज्यांचे कॅरेक्टर्स असे आहे ज्या पक्षाचे कॅरेक्टर असं आहे ते खरे बोलतील का. मणिपूरमध्ये महिलांना निर्वस्त्र करून त्यांची धिंड काढली जाते तेव्हा मोदी काही बोलत नाही त्यावेळेस अपमान होत नाही का. प्रज्वल रेवण्णाच्या प्रचाराला कोण गेलो होतं. आशिष शेलार यांनी किशोरी पेडणेकरांविषयी वक्तव्य केलं होतं तेव्हा काय झालं तेव्हा महिलांचा अपमान झाला नाही का," असा सवाल अरविंद सावंत यांनी केला.
"ज्यांच्या पक्षांचे कॅरेक्टर असं आहे ते दुसऱ्यांवरती आरोप लावतात ही आश्चर्याची गोष्ट आहे. ५५ वर्षापासून मी पक्षात आहे. मी नेहमीच महिलांचा गौरव आणि सन्मान केला आहे. माझ्या तोंडातून कधी चुकीचे शब्द निघाले नाहीत. जे आहे ते सत्य सांगा खोटं बोलू नका. खोटं बोलण्याची तुमची सवय आहे. शायना एनसी या माझ्या परिचयाच्या आहेत. त्यांनी माझ्यासाठी काम केलं आहे. मी त्यांचा आधी सन्मान करत होतो आताही करतोय आणि यापुढे करत राहील, असंही अरविंद सावंत म्हणाले.