पोलिसांनी टाळलं मुंबईवरील संकट; पेट्रोलऐवजी धोकादायक तेल आयात करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 11:16 AM2024-10-15T11:16:50+5:302024-10-15T11:21:03+5:30
मुंबईत धोकादायक पेट्रोलियम पदार्थांची अवैध आयात केल्याप्रकरणी तीन कंपन्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Mumbai Crime : महाराष्ट्रातील धोकादायक पेट्रोलियम पदार्थांच्या प्रकरणात नवी मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला आहे. नवी मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १.४ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या घातक पेट्रोलियम उत्पादनांची अवैध आयात आणि वाहतूक केल्याप्रकरणी मुंबईस्थित तीन कंपन्यांच्या प्रतिनिधींविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे. उरणचे सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी हुलगे यांनी सांगितले की, एका गुप्त माहितीच्या आधारे कस्टम अधिकाऱ्यांनी १२ जुलै रोजी एका आयात कंपनीच्या आवारात छापा टाकला होता.
या छाप्यादरम्यान, पोलीस अधिकाऱ्यांना पेट्रोलियम पदार्थ असलेले आठ टँकर सापडले. तपासात असे दिसून आले हा पेट्रोलियम पदार्थ साठवलेल्या तीन कंपन्यांनी याला प्रोसेस ऑइल ४० असे नाव दिले होते. खरं पाहायला गेलं तर तो सामान्यतः उत्पादनासाठी वापरला जाणारा ज्वलनशील पदार्थ आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छाप्यानंतरच्या तपासणीत हा द्रव पदार्थ अत्यंत ज्वलनशील पेट्रोलियम हायड्रोकार्बन ऑईल असल्याचे समोर आलं आहे. त्याच्या वाहतुकीसाठी विशेष परवानग्या आणि कडक सुरक्षा खबरदारी आवश्यकता असते. या पदार्थाचे धोकादायक स्वरूप माहीत असूनही कंपन्यांनी आवश्यक परवान्याशिवाय त्याची वाहतूक केल्याचा आरोप आहे. यामुळे सार्वजनिक सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला होता. उरण पोलिसांनी रविवारी मुंबईतील सांताक्रूझ येथील तीन कंपन्यांच्या प्रतिनिधींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांतर्गत एफआयआर नोंदवला.
तिन्ही कंपन्यांविरुद्ध अत्यावश्यक वस्तू कायदा, पेट्रोलियम कायदा, स्फोटक कायदा तसेच हाय स्पीड डिझेल ऑईल आणि लाइट डिझेल ऑईल (वापर प्रतिबंध) ऑर्डर १९७४ आणि मोटर स्पिरिट आणि हाय-स्पीड या कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले. डिझेल (पुरवठा, वितरण आणि गैरप्रकार) ऑर्डर २००५ चे उल्लंघन (प्रतिबंधाचे नियमन) अंतर्गत देखील गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, याआधी जुलै महिन्यात नवी मुंबईतील उरण शहरात विनापरवानगी घातक पेट्रोलियम पदार्थांची हाताळणी आणि साठवणूक केल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. अनमोलसिंग सेठी आणि कविशी सिंग या आरोपींविरुद्ध अत्यावश्यक वस्तू कायदा आणि पेट्रोलियम नियमांच्या तरतुदींनुसार उरण पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला होता. त्यांच्याकडून जवळपास १४ लाख रुपयांचा साठाही जप्त करण्यात आला होता. या दोघांनी एप्रिलमध्ये उरणमधील पार्किंग एरियात संबंधित अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय प्रोसेस ऑइल ४० हा अत्यंत ज्वलनशील पदार्थ साठवला होता.