मोहन डेलकर आत्महत्येप्रकरणी मोठी कारवाई, या व्यक्तिविरोधात दाखल झाला गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 01:08 PM2021-03-10T13:08:29+5:302021-03-10T13:09:04+5:30
Mohan Delkar suicide case : दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईतील हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. दरम्यान, या प्रकरणावरून महाराष्ट्राच्या राजकारणातही मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप होत आहेत.
मुंबई - दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर (Mohan Delkar ) यांनी मुंबईतील हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. दरम्यान, या प्रकरणावरून महाराष्ट्राच्या राजकारणातही मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप होत आहेत. दरम्यान, या प्रकरणात मुंबईमध्ये पहिला गुन्हा दाखल झाला आहे. मोहन डेलकर यांच्या आत्महत्येप्रकरणी दादर व नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल खोडा पटेल यांच्याविरोधात अॅट्रोसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. (A case has been registered in Mohan Delkar suicide case)
मोहन डेलकर यांनी आत्महत्या केल्यानंतर घटनास्थळावरून सुसाइड नोट जप्त करण्यात आली होती. त्यामध्ये भाजपाच्या काही नेत्यांची नावे असल्याचा दावा करण्यात येत होता. दरम्यान, काल सभागृहामध्ये विरोधक मनसुख हिरेन यांच्या आत्महत्या प्रकरणावरून विरोधक आक्रमक झाल्यानंतर सत्ताधारी शिवसेनेच्या नेत्यांनी मोहन डेलकर यांच्या आत्महत्येची चौकशी करण्याची मागणी लावून धरली होती.
दरम्यान, आज अखेर मोहन डेलकर यांच्या आत्महत्येसंदर्भात दादर व नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल खोडा पटेल यांच्याविरोधात अॅट्रोसिटी अॅक्ट अंतर्गत मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला. मोहन डेलकर यांच्या आत्महत्येनंतर सापडलेल्या सुसाइड नोटमध्ये प्रफुल्ल खोडा पटेल यांचे नाव असल्याचे सांगण्यात येत होते. तसेच प्रफुल्ल खोडा पटेल यांच्याकडून मोहन डेलकर यांना मानसिक त्रास देण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत होता.
मोहन डेलकर आत्महत्याप्रकरणी न्यायाची मागणी करत डेलकर यांच्या कुटुंबीयांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. यावेळी मोहन डेलकर यांच्या कुटंबीयांनी या प्रकरणाच्या सखोल तपासाची मागणी केली. आम्हाला केंद्र सरकारने मदत केली नाही. मात्र आता महाराष्ट्र सरकारव आमचा पूर्ण विश्वास आहे. त्यांच्याकडून या प्रकरणाचा योग्य तपास होईल, अशी अपेक्षा मोहन डेलकर यांच्या पुत्राने व्यक्त केली. तसेच या मोहन डेलकर यांना गेल्या १६ महिन्यांपासून प्रचंड त्रास देण्यात येत होता. या मानसिक त्रासामुळेच त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोपही त्यांनी केला.