ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ११ - गुजरातमध्ये २००४ सालच्या चकमकीत मारल्या गेलेल्या इशरत जहाँला निर्दोष ठरवणा-या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जितेंद्र आव्हाडांनी डेव्हिड हेडलीच्या कबुलीनंतर आता सावध पवित्रा घेत नरमाईची भूमिका घेतली आहे. ' या प्रकरणाचा मला नीट अभ्यास करावा लागेल' असे सांगत आव्हाड बॅकफूटवर गेले आहेत. एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी सावध पवित्रा घेतला.
मुंबई हल्ल्याप्रकरणी अमेरिकेतील तुरुंगातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे साक्ष देणा-या डेव्हिड हेडलीने आज ' इशरत जहाँ ही लष्कर-ए-तोयबाची दहशतवादी आणि सुसाईड बॉम्बर होती' असा धक्कादायक खुलासा केला. त्याच्या या कबुलीनंतरही तुम्ही इशरतला निर्दोष मानता का? असा सवाला आव्हाड यांना विचारण्यात आला असता 'हेडली नेमकं काय बोलला ते मला अजून माहित नाही, ते मला जाणून घ्यावं लागेल. नंतर मला इशरत जहाँप्रकरणाचा अभ्याल करावा लागेल' असं आव्हाड म्हणाले.
मात्र हेडलीच्या कबुलीबाबतही त्यांनी संशय व्यक्त केला. ‘ इशरत जेव्हा चकमकीत मारली गेली त्यावेळी हेडली अमली पदार्थांची तस्करी करत होता. तोपर्यंत त्याचा लष्करशी संबंधही नव्हता. म्हणून त्याने इशरतबद्दल दिलेली माहिती कितपत खरी आहे हे आधी पहावं लागेल. त्याचा वादग्रस्त इतिहास पाहता, त्याच्या कबुलीवर किती विश्वास ठेवायचा हे ठरवावं लागेल' असे आाव्हाडांनी सांगितलं.
गुजरमधील चकमकीत इशरतच्या झालेल्या मृत्यूवरून मोठं राजकारण झालं होतं, अनेकांनी तिला निर्दोष ठरवत तिच्या कुटुंबियांना पाठिंबा दिला होता. जितेंद्र आव्हाडांनी तर इशरतच्या कुटुंबियांना आर्थिक मदतही केली होती. मात्र आज हेडलीच्या कबुलीनंतर हेच आव्हाड बॅकफूटवर गेलेल दिसत आहेत.
काय म्हणाला हेडली ?
इशरत जहाँ ही लष्करची दहशतवादी आणि महिला विंगेची सुसाईड बॉम्बर होती. कोणत्या तरी एका नाक्यावर पोलिसांना मारण्याचा कट होता, त्यात ती सामील होती. तसचे गुजरातचे अक्षरधाम मंदिर उडवणे व गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना मारण्याची जबाबदारीही तिला देण्यात आली होती असे महत्त्वपूर्ण खुलासे आज हेडलीने केले.