Join us

सरकारी वकील प्रवीण चव्हाणांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल; १० कोटी मागितल्याची तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 9:44 AM

तक्रारीवरून कुलाबा पोलिसांनी चव्हाण यांच्याविरुद्ध मंगळवारी खंडणीचा गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : न्यायालयीन कोठडीत असताना सुनावणीदरम्यान विशेष सरकारी वकील प्रवीण पंडित चव्हाण यांनी जातीवाचक टिप्पणी करत दहा कोटींच्या खंडणीची मागणी केल्याचा आरोप माजी आमदार रमेश कदम यांनी केला आहे. त्यांच्या तक्रारीवरून कुलाबा पोलिसांनी चव्हाण यांच्याविरुद्ध मंगळवारी खंडणीचा गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे.

बोरीवलीतील रहिवासी असलेले माजी आमदार रमेश नागनाथ कदम (५३) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. तक्रारीनुसार, २०१४ ते २०१९ दरम्यान दहिसर पोलिस ठाण्यात फसवणुकीसह लाचलुचपत प्रतिबंध कायद्यान्वये दाखल गुन्ह्यांमध्ये कदम यांना अटक करून न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. वेळावेळी पोलिस बंदोबस्तामध्ये न्यायालयीन सुनावणीसाठी सत्र न्यायालयात आणण्यात येत असताना, २१ जानेवारी २०१६ रोजी दुपारी २ च्या सुमारास न्यायालयाच्या प्रवेशद्वारातच चव्हाणने रागाने बघून जातीवाचक विधान केले.

'तू जे पैसे खाल्लेत त्यातील दहा करोड रुपये मला दे, पैसे दिले नाहीत तर तू जेलमधून कधीच सुटणार नाही, अनेक वर्षापर्यंत जेलमध्येच राहावे लागेल', असे म्हणत धमकाविल्याचा आरोप कदम यांनी केला आहे. यावेळी गुन्ह्याच्या तपास अधिकारीदेखील हजर असल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे. 

न्यायालयीन कोठडीत असल्याने चव्हाणविरुद्ध तक्रार केल्यास न्याय मिळेल याची आशा नसल्याने त्यावेळी तक्रार केली नसल्याचे कदम यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार, मंगळवारी कदम यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चव्हाण यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

टॅग्स :मुंबईमुंबई पोलीसगुन्हेगारी