Join us  

चैन खरी आहे की खोटी? विचारत वृद्धेला लुबाडले; अंधेरीतील धक्कादायक प्रकार

By गौरी टेंबकर | Published: July 19, 2024 11:32 AM

याप्रकरणी महिलेने अंधेरी पोलिसात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई: तुमच्या गळ्यातील चैन खरी आहे की खोटी? असे विचारत बोलण्यात गुंतवून एका वृद्धेला लुबाडण्याचा प्रकार अंधेरी परिसरात घडला. त्यावेळी ही महिला पूजा करून मंदिरातून परतत होती. याप्रकरणी तिने अंधेरी पोलिसात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार उर्मिला पाठक (६५) या गुंदवली हिल परिसरात कुटुंबासोबत राहत असून त्या १७ जुलै रोजी पहाटे ५:३० वाजता स्थानिक परिसरात असलेल्या साईबाबा मंदिरात गेल्या होत्या. त्यांनी दर्शन घेतले आणि पूजापाठ उरकून पुन्हा ५:४५ च्या सुमारास त्या पायी त्यांच्या बिल्डिंगकडे निघाल्या. त्यादरम्यान तोंडाला रुमाल आणि डोक्यावर हेल्मेट घातलेला अनोळखी इसम त्यांच्या जवळ आला आणि त्याने पाठक यांना अपने गले मे पहने हुई सोने की चैन निकाल के रखो असे सांगितले. तसेच तुम्हारा चेन दिखाओ नकली है या असली असे बोलून त्याने पाठक यांच्याकडून त्यांची सोनसाखळी घेतली. त्यानंतर त्याच्या हातातील पिशवी त्यांच्याकडे देत त्यात ती चैन  ठेवल्याचे सांगितले आणि मोटरसायकल वरून निघून गेला. पाठक यांनी ती पिशवी तपासली तेव्हा त्यात चैन सापडली नाही आणि आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी त्यांनी मुलासोबत अंधेरी पोलीस ठाणे गाठत अनोळखी व्यक्तीच्या विरोधात १२ ग्रॅम आणि जवळपास ८४ हजार रुपये किमतीची लॉकेटसह असलेली चैन चोरणाऱ्याच्या विरोधात तक्रार दिली. पोलिसांनी बीएनएस कायद्याचे कलम ३१८(४) अंतर्गत अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. 

टॅग्स :मुंबईमुंबई पोलीसगुन्हेगारी