पायल तडवी आत्महत्या प्रकरणी तीनही आरोपींचा जामीन फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 06:06 AM2019-06-25T06:06:10+5:302019-06-25T06:07:04+5:30
मुंबई : नायर रुग्णालयाच्या प्रशिक्षणार्थी डॉक्टर पायल तडवी यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या डॉ. हेमा आहुजा, भक्ती मेहरे ...
मुंबई : नायर रुग्णालयाच्या प्रशिक्षणार्थी डॉक्टर पायल तडवी यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या डॉ. हेमा आहुजा, भक्ती मेहरे व डॉ. अंकिता लोखंडवाल या तीनही आरोपींचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने सोमवारी फेटाळला. जामीन अर्ज फेटाळल्यानंतर तिघींच्याही डोळ््यात पाणी आले.
२८ व २९ मे रोजी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांनी ४ जून रोजी विशेष न्यायालयात जामीन अर्ज सादर केला. त्यांच्या जामीन अर्जास सरकारी वकील व तडवीच्या कुटुंबीयांनी तीव्र विरोध केला. त्या जामिनावर सुटल्या तर आमच्या जीवाला धोका आहे, असे पायलच्या कुटुंबीयांनी न्यायालयाला शुक्रवारी सांगितले.
आरोपींचे वकील आबाद पौडा यांनी जामीन मंजूर करावा, अशी विनंती न्यायालयाला केली. तिघी महिला डॉक्टरही आहेत. पायल आत्महत्या करेल, असा विचारही त्यांनी केला नाही. त्या डॉक्टर आहेत, रुग्णांचे जीव वाचवितात. त्यामुळे त्या जीव घेऊ शकत नाही. हत्येचे प्रकरण असले तरी न्यायालय महिला आरोपीचा जामीन मंजूर करते. आरोपींचे करिअर संपले आहे. आरोपींमुळे एखाद्याचा जीव गेला आहे, असा शिक्का त्यांच्यावर माथ्यावर मारला गेला आहे. त्यामुळे त्यांच्याशी कोण विवाह करणार?, असा युक्तिवाद पौडा यांनी न्यायालयात केला.
बचावपक्षाच्या युक्तिवादावर आक्षेप घेत विशेष सरकारी वकील राजा ठाकरे यांनी म्हटले की, तुम्ही म्हणता की आरोपींचे करिअर संपले. पण त्यांचे (तडवी कुुटुंबीय) आयुष्य उद्ध्वस्त झाले. एका तरुणीने तिचे आयुष्य संपविले. आपल्याशी विवाह कोण करेल, याची चिंता आरोपींना आहे. याप्रकरणी पहिल्या आरोपीला (मेहरे) अटक केल्यानंतर बाकीच्या दोघींनी पोलिसांपुढे शरण जायला हवे होते. मात्र तसे झाले नाही, असेही ठाकरे यांनी युक्तिवाद करताना म्हटले.
असा झाला युक्तिवाद
आरोपींनी पीडितेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले नाही. त्यांना पायलची हत्या करायची नव्हती किंवा तिने आत्महत्या करावी, असेही त्यांना वाटत नव्हते. त्या केवळ तिच्या कामावरून तिची टर उडवायच्या. त्यांना तिची जात माहीत नव्हती, असा युक्तिवाद पौडा यांनी केला. तर, या तिन्ही आरोपींना पीडितेची जात माहीत होती. त्यामुळे त्यांनी तिला सतत छळले, असा युक्तिवाद ठाकरे यांनी केला.
संशयाचे अनुत्तरीत मुद्दे
दिवंगत डॉ. पायल तडवी हिच्या कुटुंबियांचे वकील अॅड. डॉ. गुणरत्न सदावर्ते यांनी उपस्थित केलेले काही महत्त्वाचे संशयाचे मुद्दे न्यायालयाने आरोपींचा जामीन फेटाळताना विचारात घेतले आणि त्या संशयाचे निराकरण करण्यासाठी आरोपींना कोठडीत ठेवून त्यांचे जाबजबाब घेणे गरजेचे आहे, असे नमूद केले.
त्यापैकी काही मुद्दे असे :
डॉ. पायल ड्युटीवर आली नाही हे तिची रूम पार्टनर डॉ. स्नेहल शिंदे हिला कळण्याआधी आरोपींना कसे कळले?
हे कळल्यावर आरोपी लगेच डॉ. पायल यांच्या रुमवर कशा आल्या?
सुरक्षा रक्षकांकडून रूमचा दरवाजा उघडून घेतल्यावर डॉ. पायल गळफास घेऊन लटकताना दिसली. आरोपींनी तिला खाली काढून लगेच ‘आयसीयू’मध्ये दाखल केले. पण त्या तेथे थांबल्या नाहीत.
‘आयसीयू’मधून आरोपी पुन्हा डॉ. पायल यांच्या रूमवर आल्या व सुमारे सात मिनिटे तेथे थांबल्याचे सीसीटीव्हीच्या फूटेजमध्ये दिसते. यावेळी त्यांनी रूममध्ये नेमके काय केले?
याशिवाय १० जून रोजी आरोपींनी न्यायालयाबाहेर डॉ. पायल यांचे पती सलमान यांना ‘तुम्हाला पाहून घेऊ’, अशी धमकी दिली होती, त्यामुळे आरोपींना जामिनावर सोडल्यास तपासाला बाधा येऊ शकते, ही अॅड. सदावर्ते यांनी मांडलेली बाबही न्यायालयाने विचारात घेतली.