लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पाकिस्तानचा उल्लेख करून माध्यमांमध्ये जाहिरात दिल्याप्रकरणी झालेल्या तक्रारीनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. त्याचबरोबर कसाब आणि शहीद हेमंत करकरे यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी विजय वडेट्टीवार यांच्याविरोधातही झालेल्या तक्रारीनंतर आयोगाने गुन्हा दाखल केला आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम आणि अतिरिक्त निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी यांनी मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
भाजपकडून मागील आठवड्यात, ‘तुमच्या मताने कुठे जल्लोष व्हायला हवा, भारतात की पाकिस्तानात?’ अशी जाहिरात देण्यात आली होती. याप्रकरणी काँग्रेसने तक्रार दिल्यानंतर आयोगाने ठाण्यात गुन्ह्यात दाखल केला असल्याची माहिती किरण कुलकर्णी यांनी दिली. तसेच २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात पोलिस अधिकारी हेमंत करकरे कसाबच्या नव्हे तर संघाशी जवळीक असलेल्या पोलिस अधिकाऱ्याच्या गोळीने ठार झाल्याचे विधान वडेट्टीवार यांनी केले होते. त्यांच्याविरोधात भाजपकडून तक्रार दाखल झाली होती. त्यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बारामतीतील पैसे वाटप प्रकरणात ४ गुन्हे बारामतीत मतदानाच्या दिवशी पैसे वाटपाच्या अनेक तक्रारी आणि व्हिडीओसमोर आले होते. त्याप्रकरणी आयोगाने तातडीने कारवाई केली असल्याची माहिती कुलकर्णी यांनी दिली. आमच्या माहितीनुसार ४ प्रकरणात गुन्हे दाखल झाला असल्याचे त्यांनी सांगितले.