मुंबई : दहिसर टोलनाका येथे पोलिसांची परवानगी न घेता आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे आरिफ शेख यांच्यासह ७० कार्यकर्त्यांविरोधात दहिसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, दहिसर परिसरात रस्त्याच्या दुरावस्थेबाबत तसेच वाहनधारकांना उपलब्ध असणाऱ्या अपुऱ्या सोयी-सुविधांबाबत चर्चा करण्यासाठी शेख यांनी हे आंदोलन केले. याची माहिती मिळाल्याने दहिसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रवीण पाटील आणि त्यांच्या पथकाने या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.
परवानगी न घेतल्याने अशाप्रकारे जमाव जमवून आंदोलन करता येणार नाही, असे पाटील यांनी त्यांना समजावले. मात्र, तरीही कार्यकर्त्यांनी हे आंदोलन सुरूच ठेवल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले.