Aaditya Thackeray:शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्या अडचणीत वाढ झाल्याची माहिती मिळत आहे. मुंबईत मध्यरात्री आदित्य ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. आदित्य ठाकरे यांच्यासह ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य ठाकरे यांच्यावर मुंबईत शुक्रवारी मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला. मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी हा गुन्हा दाखल केला. बेकायदेशीर जमाव जमवून पुलाचे उद्घाटन केल्या प्रकरणात आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुलाची चाचणी झाली नसतानाही आदित्य ठाकरे यांनी पुलाचे उद्घाटन केले. याप्रकरणी आदित्य ठाकरे यांच्यासोबत शिवसेना पदाधिकारी सुनिल शिंदे, सचिन अहिर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. मुंबई पालिकेचे दोन अधिकारी रात्री साडेअकरानंतर पोलीस स्थानकात दाखल झाले. रात्री तीन वाजेपर्यंत हे अधिकारी पोलीस ठाण्यात होते. पोलिसांनी या दोन अधिकाऱ्यांचा जबाब नोंदवला. त्यानंतर आदित्य ठाकरे आणि इतर पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
बेकायदेशीररित्या आणि शासकीय कामात अडथळा
डिलाई रोड ब्रिजच्या लेनचे उद्घाटन केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेच्या रोड डिपार्टमेंटकडून एन. एम. जोशी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आाला आहे. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात बेकायदा पद्धतीने आणि शासकीय कामात अडथळा आणून डिलाई रोडच्या दुसऱ्या लेनचे काम अपूर्ण असताना उद्घाटन करण्यात आले होते. डिलाई रोडवर इतर कामे अपूर्ण असताना आणि साधारणपणे सात दिवसानंतर या पुलाचे काम पूर्ण करून लेन सुरू करण्याचे नियोजन मुंबई महापालिकेने केले होते. मात्र, अशाप्रकारे उद्घाटन करणे बेकायदा असल्याचे मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. महापालिकेच्या नियोजित उद्घाटनापूर्वीच आदित्य ठाकरेंनी या पुलाचे उद्घाटन करून त्यावरून वाहतूक सुरू केली.
दरम्यान, मुंबईतील लोअर परळ उड्डाणपुलाची एक मार्गिका सुरु करण्यात आली होती. परंतु दुसऱ्या मार्गिकेचे काम सुरु होते. हा पूल सुरु करण्यासंदर्भातील यापूर्वी अनेकवेळा डेडलाइन दिल्या होत्या. परंतु पुलाच्या दुसऱ्या मार्गिकेचे काम पूर्ण झाले नव्हते. हे काम रखडल्यामुळे अखेरीस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उद्घाटन करण्यात आले. पुलाच्या उद्घाटन कार्यक्रमास आदित्य ठाकरे उपस्थित होते. त्यानंतर लोअर परेल पुलाच उद्घाटन केल्याप्रकरणी आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटाचे नेते आणि पदाधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.