लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि इतर दोघांविरुद्ध एका व्यक्तीला जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाला आहे. त्यानुसार गुन्हे शाखेच्या कक्ष ६ कडून तपास करण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे व्यावसायिक आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी भुजबळ यांना दोन व्हिडिओ फॉरवर्ड केले होते. ज्यामध्ये भुजबळ यांनी कथितपणे हिंदू धर्माविरुद्ध काही वक्तव्य केली होती. त्यानंतर तक्रारदाराला ठार मारण्यात येईल, अशा आशयाची धमकी देण्यात आली. त्यानुसार त्याने चेंबूर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यांच्या जबाबानुसार पोलिसांनी भुजबळ यांच्यासह तिघाजणांवर गुन्हा दाखल केला. शुक्रवारी रात्री उशिरा चेंबूर पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आल्याचे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे . भुजबळ आणि इतर दोघांविरुद्ध धमकी तसेच इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मी फोन केला असल्यास चौकशी करावी : भुजबळ
सध्याच्या राजकीय परिस्थितीचा फायदा घेत आमचा पूर्वीचा मित्र व नंतर शत्रुत्व पत्करलेल्या ललित शाम टेकचंदानी यानेच व्हॉटस्ॲपद्वारे आपल्याला चित्र-विचित्र मेसेज केले. आपल्याकडे त्याचा क्रमांक नसल्याने एका कार्यकर्त्याने त्याला फोन करून विचारपूस करण्याचा प्रयत्न केला. त्यात धमकी, शिवीगाळ असा काही प्रकार नव्हता, निव्वळ फोन केला म्हणून टेकचंदानी याने पोलिसांत तक्रार दिली आहे. या साऱ्या प्रकरणाची चौकशी करावी, असे पत्र आपण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना पाठविले असल्याचा खुलासा छगन भुजबळ यांनी केला आहे. त्याला कोणतीही धमकी, शिवीगाळ करण्यात आलेली नाही. असे असतानाही त्याने खोटी तक्रार देऊन आपली प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला असून, लवकरच यासंदर्भात वकिलांचा सल्ला घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल, असेही भुजबळ म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"