Join us

सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणी ३ डिसेंबरपासून अंतिम सुनावणी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2018 6:18 AM

सोहराबुद्दीन शेख आणि तुलसीराम प्रजापती बनावट चकमक प्रकरणी विशेष न्यायालय ३ डिसेंबरपासून अंतिम सुनावणी घेणार आहे. न्यायालयाने शुक्रवारी सर्व आरोपींचे जबाब नोंदविण्याचे काम पूर्ण केले.

मुंबई : सोहराबुद्दीन शेख आणि तुलसीराम प्रजापती बनावट चकमक प्रकरणी विशेष न्यायालय ३ डिसेंबरपासून अंतिम सुनावणी घेणार आहे. न्यायालयाने शुक्रवारी सर्व आरोपींचे जबाब नोंदविण्याचे काम पूर्ण केले.फौजदारी दंडसंहिता ३१३ अंतर्गत विशेष न्यायालयाने सर्व आरोपींचे जबाब नोंदविले. या कलमांतर्गत आरोपीला त्याचे म्हणणे मांडण्यासाठी अखेरची संधी देण्यात येते. आरोपींचे जबाब नोंदवून झाल्यानंतर आरोपींच्या वकिलांनी आपण बचावासाठी एकाही साक्षीदाराची साक्ष नोंदविणार नसल्याची माहिती न्यायालयाला दिली. त्यामुळे न्यायालयाने ३ डिसेंबरपासून अंतिम सुनावणीला सुरुवात करू, असे स्पष्ट केले.नोव्हेंबर २००५ मध्ये कथित गँगस्टर सोहराबुद्दीन शेख आणि त्याची पत्नी कौसर बाई यांना गुजरात दहशतवाद प्रतिबंधक पथकाने ताब्यात घेतले. हैदराबादवरून ते सांगली येथे चालले होते. या दोघांनाही गांधीनगर येथे ताब्यात घेण्यात आले आणि त्यानंतर तीन दिवसांनी शेख व त्याच्या पत्नीची हत्या झाली. मात्र, पोलिसांनी ही हत्या नसून चकमकीत त्यांना ठार करण्यात आल्याचे सांगितले. तसेच या घटनेचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तुलसीराम प्रजापती याचीही हत्या करण्यात आली. मात्र, तो सुद्धा चकमकीत ठार केल्याचे रेकॉर्डवर दाखविण्यात आले. या घटनेची सीबीआय चौकशी करण्यात आल्यानंतर या दोन्ही बनावट चकमकी असल्याचे सिद्ध झाले.>सीबीआयचे वकील करणार पहिल्यांदा युक्तिवादविशेष न्यायालय या प्रकरणी ३ डिसेंबरपासून अंतिम सुनावणी घेणार आहे. सीबीआयचे वकील बी. पी. राजू पहिल्यांदा अंतिम युक्तिवादाला सुरुवात करतील. सोहराबुद्दीन शेख आणि तुलसीराम प्रजापती बनावट चकमकप्रकरणी सीबीआयने आतापर्यंत ३८ जणांवर गुन्हे नोंदविले. त्यापैकी १६ जणांची आरोपमुक्तता करण्यात आली आहे. तर २२ जणांवर खटला चालविण्यात येत आहे.