…पण मी संयम बाळगलाय! सुशांत सिंग राजपूत प्रकरणात अखेर मंत्री आदित्य ठाकरेंनी मौन सोडलं
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2020 06:54 PM2020-08-04T18:54:46+5:302020-08-04T19:03:36+5:30
अशाप्रकारे चिखलफेक करुन सरकार आणि ठाकरे कुटुंबाची बदनामी करता येईल या भ्रमात कोणी राहू नये तूर्त इतकेच अशा शब्दात शिवसेना मंत्री आदित्य ठाकरेंनी विरोधकांवर तोफ डागली आहे.
मुंबई – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरणात मंत्री आदित्य ठाकरेंचे नाव गोवण्याचं विरोधकांचा प्रयत्न होता, त्यावर आता खुद्द मंत्री आदित्य ठाकरेंनी पत्रक काढून या प्रकरणावर मौन सोडलं आहे. कोरोना संकटाने देशभरात हाहाकार माजवला आहे, राज्य सरकारही कोरोनाचा पराभव करण्यासाठी शर्थ करत आहे, बहुदा महाराष्ट्र सरकारचे यश, लोकप्रियता ज्यांना खुपते त्यांनी सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचे घाणेरडे राजकारण सुरु केले आहे असा आरोप त्यांनी केला.
याबाबत आदित्य ठाकरे म्हणतात की, सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी व्यक्तिश: माझ्यावर तसेच ठाकरे कुटुंबावर नाहक चिखलफेक करण्यात येत आहे, ही एक प्रकारे वैफल्यातून उमटलेली राजकीय पोटदुखीच आहे. मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा हा प्रकार माणुसकीला कलंकित करणारा आहे. मुळात या प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही. सिनेसृष्टी म्हणजे बॉलिवूड हे मुंबई शहराचे एक महत्त्वाचे अंग आहे. या उद्योगावर हजारोंचा रोजगार अवलंबून आहे. त्यापैकी अनेकांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध नक्कीच आहेत हा काही गुन्हा नाही असं त्यांनी म्हटलं आहे.
हे तर गलिच्छ राजकारण pic.twitter.com/SvvBtU6qHC
— Aaditya Thackeray (@AUThackeray) August 4, 2020
तसेच सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू तितकाच धक्कादयक आहे, मुंबई पोलीस खोलवर तपास करत आहे. पण ज्यांचा कायद्यावर विश्वास नाही तेच लोक याप्रकरणी फालतू आरोपांचा धुरळा उडवीत तपास भरकटवण्याचा प्रयत्न करीत आहेत. मी हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा नातू म्हणून सांगतो, महाराष्ट्राच्या, शिवसेनेच्या आणि ठाकरे कुटुंबाच्या प्रतिष्ठेस तडा जाईल असं कृत्य माझ्या हातून कदापि होणार नाही, फालतू आरोप करणाऱ्यांनी हे समजून घेतले पाहिजे. या प्रकरणाची कुणाकडे काही विशेष माहिती असेल तर त्यांनी ती पोलिसांनाच घ्यायला हवी. पोलीस नक्कीच त्या दिशेने तपास करतील, या प्रश्नी मी आजही संयमानेच वागत आहे, अशाप्रकारे चिखलफेक करुन सरकार आणि ठाकरे कुटुंबाची बदनामी करता येईल या भ्रमात कोणी राहू नये तूर्त इतकेच अशा शब्दात शिवसेना मंत्री आदित्य ठाकरेंनी विरोधकांवर तोफ डागली आहे.