‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 06:14 AM2024-11-23T06:14:01+5:302024-11-23T06:15:03+5:30
ईडीने काढलेल्या लुकआउट नोटीसच्या आधारे गुजरातमधील विमानतळावर इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी शफी याला ताब्यात घेतले.
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘कॅश फॉर व्होट’ प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग तपासात गुजरातहून अटक केलेल्या एका व्यक्तीला विशेष पीएमएलए न्यायालयाने २९ नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली. आरोपी नागनी अक्रम मोहम्मद शफी हा गुन्ह्यातील ‘मास्टरमाइंड’ असून त्याने १४ सहकारी बँकांमध्ये खाती उघडली आणि हवालाद्वारे मिळालेले १०० कोटी रुपये वेगवेगळया शेल कंपन्यांमध्ये वळवले, असे ईडीने न्यायालयाला सांगितले.
ईडीने काढलेल्या लुकआउट नोटीसच्या आधारे गुजरातमधील विमानतळावर इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी शफी याला ताब्यात घेतले. तो दुबईला पळण्याच्या तयारीत होता. त्यानंतर ईडीने त्याला पीएमएलए अंतर्गत अटक केली. आरोपीला मुंबईत विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
पोलिस कोठडी नाही सुनावली तर, त्याला निधी कोणी उपलब्ध केला, आणि त्याचे सह आरोपी कोण याचा तपास करता येणार नाही, असे म्हणत न्यायालयाने त्याला २९ नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली.
वेगवेगळ्या बँक खात्याचा वापर
विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तपास यंत्रणांनी महाराष्ट्र व गुजरातमध्ये अनेक धाडी टाकल्या. त्यावेळी पोलिसांनी मालेगावच्या एका व्यापाऱ्याला अटक केली. त्याने वेगवेगळ्या बँक खात्यांचा गैरवापर करून १०० कोटी रुपये जमा केले.
ज्या व्यक्तीच्या खात्यातून पैसे काढण्यात आले त्याने ही रक्कम निवडणुकीसाठी वापरण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना दिली. मालेगावचा व्यापारी सिराज अहमद हरुन मेमनने शफीला बँक खाती उघडण्यास मदत केली.
१४ बँक खात्यासंबंधी कागदपत्रांची छाननी केल्यानंतर शफीनेच एक ते दोन महिन्यांच्या कालावधीत लहान-मोठ्या व्यापाऱ्यांच्या बँक खात्यात सुमारे ११८ कोटी रुपये वळविले आणि पुढे ती रक्कम अन्य खात्यांत वळती करण्यात आल्याचा आरोप ईडीने केला आहे. तसेच चौकशी करून सहआरोपींचा शोध घेण्यासाठी आरोपीच्या ईडी कोठडीची मागणी केली.