नवी दिल्ली : डिजिटल पेमेंटवर ग्राहकांना जीएसटीतून राज्य सरकारांमार्फत रोख कॅशबॅक देण्याच्या प्रस्तावास जीएसटी परिषदेने शनिवारी मान्यता दिली. रुपे कार्ड, भीम अॅप आणि यूपीआय सीस्टिमवरून केलेल्या पेमेंटवर ही सवलत असेल.जीएसटी परिषदेच्या बैठकीनंतर वित्तमंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले की, इच्छुक राज्य सरकारे पथदर्शी पातळीवर डिजिटल पेमेंटसाठी प्रोत्साहन लाभाची ही योजना लवकरच जाहीर करतील. त्यासाठी आवश्यक तांत्रिक व्यवस्था जीएसटीएन आणि नॅशनल नेटवर्क कॉर्पोरेशन आॅफ इंडियाकडून लवकरच उभी केली जाईल. या योजनेची अंमलबजावणी सुरू होताच रुपे कार्ड आणि भीम अॅपवरून केलेल्या पेमेंटवर ग्राहकांना एकूण जीएसटीच्या २0 टक्के पैसे परत मिळतील. तथापि, या परताव्यास १00 रुपयांची कमाल मर्यादा असेल. त्याहून अधिक परतावा मिळणार नाही. मंत्रिसमूहाच्या अंदाजानुसार, यामुळे सरकारला वर्षाला १ हजार कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागेल.
डिजिटल पेमेंटवर मिळणार कॅशबॅक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2018 6:08 AM