तीन स्थानकांत कॅशलेस यंत्रणा
By admin | Published: July 3, 2017 07:07 AM2017-07-03T07:07:26+5:302017-07-03T07:07:26+5:30
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ठाणे आणि लोकमान्य टिळक टर्मिनसवर १०० टक्के कॅशलेस
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ठाणे आणि लोकमान्य टिळक टर्मिनसवर १०० टक्के कॅशलेस यंत्रणा उभारण्यात आली आहे. या स्थानकांवरील तिकीट, आरक्षण, माल विभाग आणि रेल्वेच्या अधिकृत आहाराच्या स्टॉलवर पीओएस (पाइंट आॅफ सेल्स) मशिन बसवण्यात आल्या आहेत. त्यामुळे रोख रकमेसह ई-चलनाचाही पर्याय रेल्वे प्रशासनाने दिल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
आधुनिकतेकडे प्रवास करणाऱ्या भारतीय रेल्वेने राज्यातील १५ रेल्वे स्थानकांवर १०० टक्के कॅशलेस यंत्रणा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्याच्या पाच विभागांतील प्रत्येकी तीन स्थानकांची निवड करण्यात आली होती. प्राथमिक टप्प्यात या १५ स्थानकांवर पीओएस मशिन बसवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
१०० कॅशलेस यंत्रणा पुरवण्यात आलेली स्थानके
पुणे विभाग - पुणे, छत्रपती शाहू महाराज टर्मिनस (कोल्हापूर), मिरज
सोलापूर विभाग - सोलापूर, कोपरगाव, साईनगर शिर्डी
भुसावळ विभाग - भुसावळ, अमरावती, नाशिक रोड
नागपूर विभाग - नागपूर, बल्लारशाह, वर्धा