मुंबई : जात प्रमाणपत्र प्रकरणी विशेष न्यायालयाने अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा व त्यांच्या वडिलांना मोठा धक्का दिला आहे. राणा यांनी दोषमुक्ततेसाठी केलेला अर्ज विशेष न्यायालयाने बुधवारी फेटाळला. तसेच शिवडी महानगरदंडाधिकारी न्यायालयाने जारी केलेल्या अजामीनपात्र वॉरंटवरही स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला.
नवनीत राणा व त्यांच्या वडिलांना महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर राहावे लागेल, असे आदेश विशेष न्यायालयाने बुधवारी दिले. जात प्रमाणपत्राच्या मुद्यावरून नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात दंडाधिकारी न्यायालयाने ऑक्टोबर महिन्यात दोनदा अजामीनपात्र वॉरंट जारी केले.
राणा ज्या जागेवरून निवडून आल्या ती जागा अनुसूचित जातीसाठी आरक्षित होती. राणा या जातीतील नसूनही त्यांनी त्या जातीचा दाखला मिळवत निवडणूक लढवली आणि ती जिंकलीही. शाळा सोडल्याच्या खोट्या दाखल्याच्या आधारे त्यांनी जात प्रमाणपत्र मिळवून फसवणूक केल्याप्रकरणी राणा व त्यांच्या वडिलांवर मुलुंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अडचणीत वाढराणा यांनी दोषमुक्तीसाठी महानगरदंडाधिकारी न्यायालयात अर्ज केला. मात्र, दंडाधिकारींनी त्यांचा अर्ज फेटाळल्याने त्यांनी विशेष न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने दंडाधिकारींचा निर्णय योग्य ठरवत अजामीनपात्र वॉरंटला स्थगिती देण्यासही नकार दिला आहे. त्यामुळे राणा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.