मुंबई : स्वातंत्र्यानंतरच्या दशकाच्या तुलनेत आज भारतीय समाजात जातीची जाणीव अधिक प्रभावी बनली आहे. आज प्रत्येक जात आपल्या ओळखीबद्दल जागरूक असून, ही ओळख लेबल राजकीय एकत्रीकरणासाठी एक चिन्ह बनल्याचे मत काँग्रेस खासदार आणि लेखक शशी थरूर यांनी व्यक्त केले. टाटा लिट्रेचर फेस्टिव्हलमध्ये ‘आंबेडकरांचा हरवलेला वारसा’ या विषयावरील चर्चेदरम्यान थरूर बोलत होते.टाटा लिट्रेचर फेस्टिव्हलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात शशी थरूर यांच्या ‘आंबेडकर : अ लाइफ’ या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनचरित्राचे प्रकाशन करण्यात आले. प्रकाशनानंतर बोलताना थरूर म्हणाले की, आंबेडकरांना जातिव्यवस्था पूर्णपणे नष्ट करायची होती आणि राजकीय पक्षांमध्ये जातिव्यवस्था अधिकाधिक रुजल्याचे लक्षात आल्यास त्यांना कदाचित भीती वाटेल. उपस्थितांमधून विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देताना म्हणाले की, भेदभाव किंवा अस्पृश्यतेविरोधात असलेले राजकीय पक्ष जातीच्या नावावर मते मागतात. त्यामुळे आजही जातिव्यवस्था नष्ट होण्यापासून खूप दूर आहे. आंबेडकर आणि जवाहरलाल नेहरू या दोघांनाही भारतातून जातिव्यवस्था नष्ट करायची होती. आधुनिकीकरणाने ती नाहीशी होईल असेही वाटले. आंबेडकरांनी जातीच्या उच्चाटनासाठी लढा दिला, कारण जोपर्यंत जातिव्यवस्थेची जाणीव आहे, तोपर्यंत दडपशाहीदेखील अस्तित्वात राहील, असे त्यांना वाटत होते. जात ही एखाद्या जुन्या शालेय टायप्रमाणे ओळखीची एक सौम्य लेबल बनावी इतकीच फक्त आपण आशा करू शकतो, असेही थरूर म्हणाले.
Shashi Tharoor: १९५० पेक्षाही आज जातीची जाणीव अधिक प्रभावी, शशी थरूर यांचं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2022 12:08 PM