Join us

विकासाला उत्तर नसले की जातीचे राजकारण होते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 1:25 AM

नितीन गडकरी : मुख्यमंत्र्यांवरील पुस्तकाच्या प्रकाशनात व्यक्त केली खंत

विशेष प्रतिनिधी ।मुंबई : विकास कामांना उत्तर देण्याची कुवत नसते तेव्हा काही जण जातीचे राजकारण करतात, अशी खंत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून गेल्या साडेतीन वर्षांत उत्कृष्ट कार्य केल्याची प्रशंसाही त्यांनी केली.‘मॅन आॅन मिशन महाराष्ट्र’ या फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळातील कार्यावर प्रकाश टाकणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन सह्याद्री अतिथीगृहावर मंगळवारी झाले. त्यावेळी गडकरी मुख्य पाहुणे म्हणून बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस, ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर सदानंद मोरे आणि फडणवीस यांचे काही सहकारी मंत्री आणि लेखक आशिष चांदोरकर यावेळी उपस्थित होते. गडकरी यांच्यामुळे मी महापौर झालो तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे मुख्यमंत्री होऊ शकलो, असे फडणवीस म्हणाले. त्यावर, राजकारणात चांगल्या व्यक्तींना संधी ही मिळतच असते. फडणवीस यांनी नगरसेवक पदापासून मुख्यमंत्री पदापर्यंत आपले कर्तृत्व सिद्ध केले असल्याचे कौतुक गडकरी यांनी केले. आज विकासाचे राजकारण होत आहे आणि फडणवीस यांच्यासारख्या नेतृत्वाने त्याला बळकटी दिली आहे, असे ते म्हणाले.‘स्वच्छ प्रतिमेचे लोक त्यांची प्रतिमा जपण्यासाठी निर्णय घेण्याबाबत चालढकल करतात, कारण ते त्यांच्या प्रतिमेच्या अधिक प्रेमात असतात. स्वच्छ प्रतिमा असूनही फडणवीस यांनी मात्र तसे होऊ दिलेले नाही, ही समाधानाची बाब असल्याचे प्रा.सदानंद मोरे म्हणाले. एस.एम.जोशींसारख्या उत्तुंगनेत्याला मुख्यमंत्री पदाची संधी मिळूनही ती त्यांनी नाकारली व बहुजनांकडे नेतृत्व असावे, असे मत मांडले होते. जातीबाबतची भीती न बाळगता फडणवीस यांनी राज्याचे चांगले नेतृत्व केले आहे, असे मोरे म्हणाले. प्रतिमा जपत असतानाच बेधडक निर्णय घेतले पाहिजेत, हे मी गडकरी यांच्याकडून शिकलो, अशी भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.ते गोड बोलून कामे करवून घेतात; मी रागावून मी रागावून, प्रसंगी शिव्या घालून यंत्रणेकडून कामे करवून घेतो. देवेंद्र गोड बोलून कामे करवून घेतो. मलाही यश येते आणि देवेंद्रला साडेतीन वर्षांत आलेले यश पुस्तकरुपाने आपल्यापुढे आहेच, असे कौतुकाचे उद्गार गडकरी यांनी यावेळी काढले. मुख्यमंत्र्यांचे वडील दिवंगत गंगाधरराव फडणवीस यांच्याशी राहिलेल्या स्रेहाचा गडकरींनी आवर्जून उल्लेख केला.

टॅग्स :नितिन गडकरी