जात पडताळणी समितीच बेकायदा
By admin | Published: October 14, 2015 04:13 AM2015-10-14T04:13:25+5:302015-10-14T04:13:25+5:30
कोकण विभागीय जात पडताळणी समितीवर अपात्र अधिकाऱ्याची सदस्य म्हणून नेमणूक केल्याने या समितीची रचनाच नियमबाह्य ठरते
मुंबई : कोकण विभागीय जात पडताळणी समितीवर अपात्र अधिकाऱ्याची सदस्य म्हणून नेमणूक केल्याने या समितीची रचनाच नियमबाह्य ठरते, असे नमूद करत या समितीने दिलेला मुरबाड येथील व्यक्तीचा जातीचा दाखला रद्द करण्याचा निर्णय बेकायदा ठरविला आहे.
ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथील हमीद अब्दुलगनी पानसरे यांनी ‘फकीर बंदरवाला’ या ‘ओबीसी’ जातीचा दाखला मिळविला होता. पानसरे यांनी हा दाखला लबाडीने व खोटी कागदपत्रे देऊन मिळविला, अशी तक्रार मुरबाड येथीलच खंडू गणपत मोरे व मेहबूब अब्दुल रहमान पैठणकर यांनी केली. त्यावरून कोकण विभागीय जात पडताळणी समितीने पानसरे यांचा दाखला रद्द करण्याचा व बनावट दाखला मिळविल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्याचा आदेश १८ मे २०१२ रोजी दिला.
समितीच्या या निर्णयाविरुद्ध पानसरे यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका केली. त्यावरील सुनावणीत पानसरे यांचे वकील अॅड. आर. के. मेंदाडकर यांनी इतर गुणात्मक मुद्द्यांखेरीज मुळात या समितीची रचनाच नियमबाह्य होती. त्यामुळे अशा समितीचा निर्णयही सर्वस्वी चुकीचा ठरतो, असा मुद्दा मांडला. (विशेष प्रतिनिधी)