Join us

आपत्कालीन परिस्थितीवर उपाययोजना : शाळांमध्ये तयार करणार ‘आकस्मिक निवारा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2018 5:26 AM

पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीची संभाव्यता लक्षात घेऊन, महापालिकेच्या सर्व २४ विभागांमध्ये प्रत्येकी ५ शाळा, याप्रमाणे एकूण १२० शाळा ‘आकस्मिक निवारा’ म्हणून निर्धारित कराव्यात, असे आदेश महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी संबंधित विभागाच्या अधिकाºयांना दिले आहेत.

मुंबई  - पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीची संभाव्यता लक्षात घेऊन, महापालिकेच्या सर्व २४ विभागांमध्ये प्रत्येकी ५ शाळा, याप्रमाणे एकूण १२० शाळा ‘आकस्मिक निवारा’ म्हणून निर्धारित कराव्यात, असे आदेश महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी संबंधित विभागाच्या अधिकाºयांना दिले आहेत.पावसाळा आता तोंडावर आला असून, या दृष्टीने काम करण्यासाठी मुंबई महापालिका सरसावली आहे. नालेसफाईच्या कामापासून डोंगर उतारावरील झोपड्यांना धोक्याचा इशारा देणे. झाडांच्या फांद्या कापणे आदी कामे मुंबई महापालिकेने हाती घेतली आहेत. प्रत्यक्षात मात्र, या कामांना अद्याप जोर आलेला नाही. यावर महापालिकेच्या बैठकांवर बैठका होत असून, या कामांना वेग यावा, म्हणून प्रशासन अधिक वेगाने पुढे सरकते आहे. याच कामाचा एक भाग म्हणून ‘आकस्मिक निवारा’तयार करण्यासाठीच्या कामालाही महापालिका लागली आहे.त्यानुसार, पावसाळ्याच्या काळातील आपत्कालीन परिस्थितीची संभाव्यता लक्षात घेऊन, महापालिकेच्या सर्व २४ विभागांमध्ये प्रत्येकी ५ शाळा, याप्रमाणे एकूण १२० शाळा ‘आकस्मिक निवारा’ म्हणून निर्धारित कराव्यात, असे आदेश देण्यात आले आहेत. २४ विभागांतील पाच शाळांच्या दर्शनी भागावर ती शाळा आपत्कालीन परिस्थिती सापेक्ष आकस्मिक निवाºयासाठी असल्याचा फलक लावावा. त्याचबरोबर, या फलकावर शाळेच्या संबंधितांचे नाव व संपर्क क्रमांक नमूद करावा, जेणेकरून आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास महापालिकेच्या कर्मचाºयांना संबंधितांशी संपर्क साधता येईल, असे आयुक्तांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.महापालिकेकडूनही प्रत्येक पावसाळ्यात डोंगर उतारावरील झोपड्यांना धोक्याचा इशारा दिला जातो. त्याचप्रमाणे, या वर्षीही महापालिकेने डोंगर उतारावरील झोपड्यांना धोक्याचा इशारा दिला आहे. महत्त्वाचे म्हणजे, अशा ठिकाणी सतर्कतेचा इशारा देणारे फलक लावावेत, तसेच सदर ठिकाणी जनजागृतीसाठी संवाद कार्यक्रम राबवावेत, असेही आदेश आयुक्तांनी दिले आहेत.दरम्यान, महापालिकेने पावसाळापूर्व कामांसाठी कंबर कसली, तरी प्रत्यक्षात मात्र दर पावसाळ्यात महापालिकेची फजिती उडतच असल्याचे चित्र असते.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकामुंबईशाळा