Join us

घरफोड्यांमुळे कामोठेवासीय असुरक्षित

By admin | Published: November 03, 2014 12:35 AM

कामोठे वसाहतीतील घरफोड्यांचे प्रमाण गेल्या काही दिवसांपासून वाढले आहे. नोकरी-व्यवसायानिमित्त बाहेर पडणाऱ्यांना परत येईपर्यंत घर सुरक्षित आहे की नाही हे सांगता येत नाही

पनवेल : कामोठे वसाहतीतील घरफोड्यांचे प्रमाण गेल्या काही दिवसांपासून वाढले आहे. नोकरी-व्यवसायानिमित्त बाहेर पडणाऱ्यांना परत येईपर्यंत घर सुरक्षित आहे की नाही हे सांगता येत नाही, इतकी दहशत रहिवाशांमध्ये पसरली आहे. परिसरात गुन्हे वाढत असताना पोलीस अधिकारी मात्र सुस्त आहेत. त्यामुळे कामोठेवासियांकडून पोलीस यंत्रणेविरोधात चीड व्यक्त करण्यात येत आहे. कामोठे नोड विकसित झाल्यानंतर या ठिकाणची लोकवस्ती झपाट्याने वाढली. नवीन पोलिस ठाणेही सुरू करण्यात आले. मार्च ते डिसेंबर २०१३ या कालावधीत दिवसा १७ घरफोड्या झाल्या. यामध्ये ८ लाखांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला. त्यापैकी फक्त चार घडफोड्यांची उकल झाली आणि फक्त सव्वा लाखांचा माल हस्तगत करण्यात आला. पोलिस ठाण्यात नोंद झालेल्या गुन्हेगारीचा आकडा पाहिल्यास खाकीवर्दीची दहशत संपली की काय, असा प्रश्न कामोठेवासीयांना पडला आहे. गेल्याच महिन्यात भरदिवसा रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून या ठिकाणी एका ज्वेलर्सला लुटले . दुकानातील सीसीटीव्ही कॅमे-यात आरोपींचे फुटेज दिसत असले तरी त्यांना पकडण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. गुन्हेगार मोकाट असून पोलिसांमधील समन्वयाचा अभाव आणि अंतर्गत कलहाने तपासाला खीळ बसली असल्याचे दिसून आले आहे. कामोठे पोलिस ठाण्यात गेल्या १८ महिन्यात ५४ घरफोड्यांची नोंद झाली. त्यामध्ये जवळपास ७० लाखांचा ऐवज चोरीला गेला. त्यापैकी फक्त १३ गुन्ह्यांची उकल करण्यात यश मिळाले. उर्वरित ४१ घरफोड्यांचा तपास प्रलंबित आहेत. (वार्ताहर)