नेरूळ-भाऊचा धक्का-मांडवा मार्गावर लवकरच कॅटमरान सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 03:25 AM2020-02-08T03:25:51+5:302020-02-08T03:26:28+5:30
महाराष्ट्र मेरिटाइम बोडार्ने (एमएमबी) भाऊचा धक्का, एलिफंटा, मांडवा आणि नेरूळ या मार्गांवर कॅटमरान सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई : महाराष्ट्र मेरिटाइम बोडार्ने (एमएमबी) भाऊचा धक्का, एलिफंटा, मांडवा आणि नेरूळ या मार्गांवर कॅटमरान सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही जलवाहतूक सुरू करण्यासाठी ‘एमएमबी’ तल्या अभिव्यक्ती स्वारस्य देकार (एक्स्प्रेशन आँफ इंटरेटस्ट) मागविले आहेत. नियमानुसार प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर नेरुळ ते एलिफंटा, नेरूळ ते मांडवा, नेरूळ ते भाऊचा धक्का आणि एलिफंटा ते भाऊचा धक्का या चार नव्या जलमार्गावर ही सेवा सुरू होईल, अशी माहिती ‘एमएमबी’तल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
साधारणत: १० वर्षांपूर्वी बेलापूर ते एलिफंटा या मार्गावर कॅटेमरान सेवा सुरू झाली होती. मात्र, प्रवाशांचा फारसा प्रतिसाद नसल्याने ती बंद करण्यात आली. गेट वे आँफ इंडिया ते मांडवा या मार्गावरील कॅटमरान सेवेला चांगला प्रतिसाद मिळतो. भाऊचा धक्कयाहून रेवस आणि उरण आणि अन्य काही मार्गांवर फेरी किंवा रो रो सेवा सुरू आहे. या परंपरागत मार्गांव्यतिरीक्त आता जलवाहतूकीच्या नव्या मार्गांची भर एमएमबीच्या कॅटमरान सेवेच्या निमित्ताने पडणार आहे.
किमान ५० प्रवाशांची क्षमता असलेल्या या कॅटमरान १० वर्षांपेक्षा जास्त जुन्या नसाव्या. त्यात प्रवाशांना कोणत्याही स्वरुपाचा धोका नसले अशा पद्धतीची आसन व्यवस्था असावी. त्यांचा ताशी वेग १५ सागरी मैलांपेक्षा जास्त असावा, त्यात जीआयएस, जीपीएस, एआरएस, रडार अशी अद्ययावत यंत्रणा असावी, असे अनेक निकष यामध्ये देण्यात आले होते.
प्रवास होणार जलद; वेळ वाचणार
नेरूळ-मांडवा या मार्गावरील प्रवास साधारणत: सव्वा ते दीड तासांत तर, उर्वरित तीन मार्गांवरील अंतर साधारणत: २० ते ३० मिनिटांत पूर्ण करता येईल, असा अंदाज आहे. या प्रवासी सेवेसाठी आवश्यक असलेल्या जेटी एलिफंटा, मांडवा आणि भाऊचा धक्का येथे आहेत. नेरुळ येथील जेटीचे काम येत्या एप्रिल महिन्यांत पूर्ण होणार आहे.